
विनाअट दोन लाखांपर्यंत सरसकट शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा रविवारी तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशीही सरकारकडून मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही. अन्नत्याग केल्याने रोहित पवार यांची तब्येत बिघडली आहे. तरीही ते आंदोलनावर ठाम आहेत. सोमवारपासून विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरी येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांचा बीपी आणि शुगर कमी झाली आहे. त्यांना अशक्तपणा आला असल्याने डॉक्टरांनी सलाईन लावण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. मात्र, सरकारकडून मंत्री गिरीश महाजन हे मध्यस्थी करण्यासाठी तोडगा काढण्यासाठी आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. ते आल्यानंतरच सलाईन घेवू, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंढरपूरला अन्नत्याग आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. सरकारने कोणत्याही अटी शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी यावेळी केली. या आंदोलनाच्या बाजूने पूर्ण ताकदीने उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेकापचे नेते जयंत पाटील, खासदार बजरंग सोनवणे, खासदार निलेश लंके, आमदार सुनील भुसारा, भावनाताई घाणेकर यांनी अन्नत्याग आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिला.
कुटुंबीय झाले भावूक
शेतकऱ्यांच्या विना अट कजर्माफीसाठी रोहित पवार यांनी पंढरपूर येथे 12 जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाला तीन दिवस झाले तरी सरकार लक्ष देत नाही. त्यातच रोहित पवार यांची तब्येत बिघडू लागली आहे. या आंदोलनस्थळी पहिल्या दिवसापासूनच रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे ठाण मांडून बसले आहेत. तर रविवारी रोहित पवार यांचे यांचं संपूर्ण कुटुंब पंढरपूरच्या आंदोलनात दाखल झाले आहे. वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार, पत्नी कुंती पवार, मुलगा शिवांश आणि आनंदिता हे सर्व रोहित पवार यांना पाहून भावूक झाले आहेत. सरकारने त्वरीत दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पप्पांचे आंदोलन आणि त्यांचा सुकलेला चेहरा पाहून रोहित पवार यांच्या मुलांच्या डोळ्यात अश्रू आले. मुलांच्या डोळ्यातील अश्रू पाहून रोहित पवार भावुक झाले. मुलांचा हात हातात घेत त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांचे डोळे पाणावले.
संपुर्ण कर्ज माफी करा- जरांगे पाटील
शेतकऱ्यांसाठी रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. खर तर सरकारने या आंदोलनाची वेळच येवू द्यायला नको होती. मात्र, सरकार शेतकरी म्हटले की द्यायला तयार होत नाही. नियम अटी लादून बेजार करत आहे. माझे सरकारला म्हणणे आहे की, एकदाचीच संपुर्ण कर्जमाफी करा, कटकट ठेवू नका, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारकडे केली आहे.


























































