Ratnagiri News – हर्णे गावात रस्त्यांच्या दुरवस्थेसह वाहतूक कोंडीचा मोठा वेढा; पर्यटकांसह स्थानिक नागरिक त्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यातील हर्णे गावातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत वाड्या, आळ्या, पेठा आणि मोहल्ल्यांमधील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. छत्रपती श्री संभाजी महाराज चौक ते श्री भवानी चौक मार्गे ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या जिल्हा परिषद रस्त्यावरील डांबर पार उखडून गेले असून, पावसाच्या सुरुवातीलाच येथे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये गढूळ पाणी साचल्याने राजवाडी, गोडीबाव, सोनारपेठ, कासारपेठ आणि ब्राह्मण आळी येथील नागरिकांना चिखल-पाणी तुडवत प्रवास करावा लागत आहे. आधीच भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या हर्णे गावात आता रस्त्यांच्या दुरवस्थेने डोके वर काढल्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर आणि ‘हरवलेल्या’ विकासावर स्थानिक जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ऐतिहासिक सुवर्णदुर्ग, गोवा किल्ला, कणकदुर्ग आणि फत्तेगड यांसारखे गड-किल्ले पाहण्यासाठी हर्णे परिसरात दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यातच शनिवार आणि रविवारी आलेल्या जोडून सुट्ट्यांमुळे लाडघर, मुरुड, कर्दे, पाळंदे, आंजर्ले आणि केळशी या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. मात्र, दापोलीहून आंजर्लेकडे जाणाऱ्या पर्यटकांना हर्णे बाजारपेठेतून प्रवास करावा लागत असल्याने आणि येथील अंतर्गत मार्ग अत्यंत अरुंद असल्याने, रविवारी या बाजारपेठेत प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, परिणामी वाहनचालकांना कित्येक तास एकाच जागेवर अडकून पडावे लागले तर पादचाऱ्यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागला.

हर्णे गावातील वाढती लोकसंख्या आणि येथील व्यापार-उद्दीम पाहता रस्ते वाहतूकयोग्य असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीवरून प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. रस्ते वेळेत दुरुस्त न केल्यास या पावसाळ्यात गटारांचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर उलटण्याची भीती वर्तवली जात आहे, ज्यामुळे आरोग्य आणि स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एका बाजूला रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला अरुंद रस्त्यांमुळे होणारी नियमित वाहतूक कोंडी या दुहेरी संकटामुळे हर्णे गावचा विकास पूर्णपणे कोलमडला असून, पर्यटनालाही याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्ते दुरुस्ती व वाहतूक नियोजनाची मोहीम हाती घ्यावी, अशी जोरदार मागणी आता नागरिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे.