कसले ऑपरेशन टायगर? आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत आणि राहणार; खा. नागेश पाटील आष्टीकरांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांची हवाच काढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mp-nagesh-patil-ashtikar-slams-operation-tiger-rumours-reaffirms-loyalty-to-uddhav-thackeray

गेल्या दोन वर्षापासून ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर अशा वल्गना चॅनलवर होत आहेत. कसले ऑपरेशन टायगर असा सवाल करून आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत आणि राहणार आहोत, कुठलाही खासदार कुणाच्याही संपर्कात नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी स्पष्ट केले. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

वृत्तवाहिन्यांवर गेल्या दोन तीन दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ असा विषय चघळला जात होता. मात्र आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर खासदारांची बैठक घेऊन संवाद साधला. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काही खासदार या बैठकीला उपस्थित होते. सर्वांनी आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याची भूमिका मांडली. ‘सूत्रां’च्या माध्यमांतून काही जणांनी अफवा पसरवण्याचे काम केले. मात्र शिवसेनेच्या खासदारांनी आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले. याच संदर्भात बोलताना ‘मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही भेटल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्या पूर्णतः खोट्या आणि निराधार असून, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निवडणूक एकतर्फी असल्याच्या वल्गना होत असल्या तरी आम्ही नेटाने या निवडणुकीत आघाडीच्या सर्व मतदारांसह सक्षमपणे उभे आहोत’, असा विश्वास नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त करत अफवांची हवाच काढली महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी आमच्या सोबत असल्याचा दावाही त्यांनी केला. वेगवेगळ्या अफवा पसरवून गैरसमज निर्माण करणार्‍या मंडळीचा समाचार घेत आम्ही एकजुटीने या निवडणुकीत सामोरे जाणार आहोत, निकाल काय येईल याची आम्हाला चिंता नाही, मात्र आपले असलेले सर्वांचे हितसबंध निश्चितच यावेळी कामी येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज हॉटेल ग्रिन फिल्ड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला खासदार नागेश पाटील आष्टीकर, आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, तालुकाप्रमुख सुनिल पाटील, बालाजी पेनूरकर आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीची स्थिती मजबूत, सर्व मतदारांशी संपर्क!

येत्या १८ जून रोजी होणार्‍या नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आघाडीचे उमेदवार कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांची स्थिती मजबूत असून, ४५२ पैकी ४०० मतदारांशी आपला संपर्क झाला आहे. ही निवडणूक अटीतटीची असून, या निवडणुकीचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे, असे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या बैठकीला जवळपास सर्व खासदार उपस्थित होते. काही खासदार ऑनलाईन उपस्थितीत होते. नांदेडच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणूक असल्याने मी त्यांना ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे अगोदरच सांगितले होते. ही निवडणूक अटीतटीची असून, आघाडीचे उमेदवार म्हणून कृष्णा नागेश पाटील आष्टीकर हे पूर्ण ताकदीने उभे आहेत. आमचा ४५२ पैकी ४०० मतदारांशी थेट संपर्क झाला असून, अनेकांच्या भेटीगाठी सुरु आहेत. या निवडणुकीत अनेक मतदार हे पर्यटनासाठी गेले असले तरी आपण त्यांच्या संपर्कात आहोत, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार या गटाचे सर्व नगरसेवक, सहकारी हे एकजुटीने आमच्या पाठीशी आहेत. अन्य पक्षाच्या उमेदवारांशी आमचा संपर्क होत आहे, काहींचा झाला आहे. समोर तगडा उमेदवार असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार हे मात्र निश्चित आहे. १८ जूनला होणार्‍या निवडणुकीत आम्ही पूर्ण तागदीनिशी आघाडीचे सर्व नगरसेवक सोबत घेवून निवडणुकीला सामोरे जात आहोत. निवडणुकीतील जयपराजयाची आपल्याला चिंता नाही, सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना आपण संपर्क केल्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले.