
डोणगाव शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी येणार असल्याची केवळ अफवा पसरताच सोमवारी शहरात एक अनोखेच चित्र पाहायला मिळाले. किराणा दुकाने, डेअरी, हॉटेल्स, पाणीपुरी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच काही मेडिकल दुकानदारांनी घाईघाईने शटर डाऊन करत जणू काही कोरोना काळातील लॉकडाऊनची आठवण ताजी केली.
अधिकार्यांचे वाहन दिसले नव्हते, कोणतीही अधिकृत कारवाई सुरू झाली नव्हती, मात्र अफवेचा वेग एवढा होता की काही मिनिटांत अनेक व्यापार्यांनी दुकाने बंद केली. या घटनेमुळे नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले. ‘जर सर्व काही नियमाप्रमाणे आणि दर्जेदार असेल, तर मग एवढी धावपळ आणि भीती कशाची?’ असा प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करत आहेत. ज्या वेगाने दुकाने बंद झाली, त्यावर काहींनी सोशल मीडियावर ‘एफडीए आली नाही, पण अफवेनेच कारवाई केली’ अशा मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर काहींनी ‘डोणगावकरांनी लॉकडाऊनचा सराव अजून विसरलेला नाही’ अशी टोलेबाजी केली.
या संपूर्ण प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याचीही गरज आहे. जर केवळ तपासणीच्या अफवेनेच व्यापार्यांमध्ये घबराट निर्माण होत असेल, तर अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, परवाने आणि नियमांचे पालन याबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणार्या व्यापार्यांना कोणत्याही तपासणीची भीती नसावी, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अधिकारी प्रत्यक्ष आलेच नव्हते, मग नेमके शटर कशासाठी खाली गेले? यावर चर्चा होत आहे.






























































