
“आरटीआय कार्यकर्तेपणा हा आता नवा व्यवसाय झाला आहे,” अशी तीव्र टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने रस्ता बांधकामाच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखालील आरटीआय कार्यकर्ते राकेश कुमार बेहल आणि त्यांच्या सहकाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. रस्ता बांधकामाच्या कामावर देखरेख ठेवण्याचा अधिकार संबंधित आरोपींना कोणी दिला, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती संदीप मेहता म्हणाले, “आरटीआय कार्यकर्तेपणा हा एक नवा व्यवसाय बनला आहे. केंद्र सरकारने निधी दिला आहे. रस्त्याचे बांधकाम कसे करायचे, याची काळजी सरकार घेईल. तुम्ही कोण आहात? स्वतःला आरटीआय कार्यकर्ते म्हणवणारे! ही पिवळी पत्रकारिता आहे.” असे म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांनीही या मताशी सहमती दर्शवत, “या सर्व रस्त्यांच्या बांधकामावर देखरेख ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही काही वरिष्ठ प्राधिकरण आहात का?” असा प्रश्न उपस्थित केला.
राकेश कुमार बेहल यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
रस्ता बांधकामातील कथित भ्रष्टाचार उघड केल्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे, असा दावा बेहल यांच्या वकिलांनी केला होता.
मात्र, एफआयआरनुसार राकेश कुमार बेहल आणि त्यांचे सहकारी राजीव कुमार उर्फ मिंटू यांनी पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील बटाला येथे सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या कामात अडथळा आणला. तसेच, कामाच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या तक्रारदाराला आणि घटनास्थळी उपस्थित मजुरांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
एफआयआरमध्ये आरोपींनी मजुरांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा तसेच तक्रारदाराला दुखापत केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 मधील विविध कलमांखाली तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने 14 मे रोजी दिलेल्या आदेशात एफआयआरमधील आरोपांमधून सरकारी कामकाजात अडथळा आणण्यात आरोपींचा थेट आणि स्पष्ट सहभाग दिसून येत असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.


























































