
ICC Women’s T20 World Cup 2026 मध्ये टीम इंडियाने धडाकेबाज सुरुवात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 64 धावांनी लोळवलं. स्मृती मनधाना आणि दीप्ति शर्मा या दोन्ही खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत टीम इंडियाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. तर आपल्या पहिल्याच सामन्यात श्री चरणीने आपल्या फिरकीची झलक साऱ्या जगाला दाखवून दिली. तिने तीन महत्त्वाचे विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 6 बाद 170 धावांचा मजबूत धावसंख्या उभारली होती. टीम इंडियाकून सलामीवीर स्मृती मनधानाने 44 चेंडूंत 68 धावांची उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 36 धावांचे योगदान दिले. डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोषने अवघ्या 17 चेंडूंत 24 धावांची वादळी खेळी करत संघाला 170 या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
टीम इंडियाने दिलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या 106 धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून सलामीवीर मुनीबा अलीचा (41 धावा) अपवाद वगळता एकाही फलंदाजाला हिंदुस्थानच्या धारधार गोलंदाजीचा सामना करता आला नाही. टीम इंडियाच्या विजयात अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि आपला पहिलाच विश्वचषक सामना खेळणारी डावखुरी फिरकीपटू श्री चरणी या दोघींनी घातक गोलंदाजी केली. दीप्ती शर्माने 4 षटकांत अवघ्या 10 धावा देत 5 बळी घेतले, तर श्री चरणीने 4 षटकांत 21 धावा खर्च करून 3 महत्त्वाचे विकेट्स घेतल. दमदार कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले.
आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच जादुई कामगिरी करून श्री चरणीने इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले आहे. टी-20 विश्वचषकाच्या पदार्पणाच्या सामन्यात कोणत्याही हिंदुस्थानी गोलंदाजाची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी 2010 मध्ये डायना डेविडने न्यूझीलंडविरुद्ध 27 धावांत 4 बळी घेतले होते, तर 2018 मध्ये डी. हेमलताने 26 धावांत 3 विकेट्स घेतले होते. चरणीच्या या धारदार गोलंदाजीने केवळ हिंदुस्थानला विजय मिळवून दिला नाही, तर स्पर्धेतील इतर विरोधी संघांनाही भारताच्या ताकदीचा इशारा दिला आहे.



























































