
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना तुरळ परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महामार्गावरील साइडपट्ट्यांची दयनीय अवस्था तसेच मध्यभागी उभारण्यात आलेल्या पट्ट्यात भराव न टाकल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
तुरळ परिसरातील अनेक ठिकाणी साइडपट्ट्या खचल्या असून पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे महामार्गाच्या मध्यभागी झाडे लावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पट्ट्यात अद्याप मातीचा भराव टाकण्यात आलेला नसल्याने तो तसाच उघडा राहिला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात वाहनचालकांसाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
याशिवाय प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा नसल्याने उन्हाळा आणि पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तुरळ, कडवई आणि परिसरातील इतर गावांमध्ये जाण्यासाठी सुरक्षित उड्डाणपूल किंवा पादचारी मार्ग नसल्याने स्थानिकांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. त्यामुळे या परिसरात वारंवार अपघात होत असून अनेक जण जखमी झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असले तरी मूलभूत सुरक्षिततेच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांना निवेदन सादर केले असून संबंधित यंत्रणा आणि ठेकेदाराने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. साइडपट्ट्यांची दुरुस्ती, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा, प्रवाशांसाठी निवारा शेड तसेच सुरक्षित उड्डाणपूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.





























































