53 मिनिटे वॉशरुममध्ये होता कर्मचारी, बॉसने मागितला वेळेचा हिशेब; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबादमधील एका कर्मचाऱ्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. कर्मचाऱ्याचा दावा आहे की, त्याची कंपनी आता कर्मचाऱ्यांच्या बाथरूम ब्रेकवर लक्ष ठेवत आहे आणि ते दिवसभरात बाथरूममध्ये किती वेळ घालवतात याची नोंद ठेवत आहे. या नवीन नियमामुळे कर्मचारी त्रस्त आहेत. त्याच्या या पोस्टवर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

अहमदाबादमधील एका कर्मचाऱ्याने दावा केला आहे की, त्याची कंपनी कर्मचाऱ्यांच्या वॉशरूम ब्रेकची वेळ मोजत आहे आणि ठरवलेली मर्यादा ओलांडल्यास त्यांना अतिरिक्त ४० मिनिटे ऑफिसमध्ये थांबायला लावत आहे. कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 53 मिनिटांच्या वॉशरूम ब्रेकसाठी त्याला अतिरिक्त ४० मिनिटे थांबण्यास सांगितले होते. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, अनेक लोकांनी कंपनीच्या धोरणावर टीका केली.

त्या कर्मचाऱ्याने आपली कहाणी रेडिट (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली. त्याने स्पष्ट केले की तो गेल्या १० महिन्यांपासून कंपनीत काम करत आहे आणि त्याच्या कामाबाबत कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. तो त्याचे सर्व काम वेळेवर पूर्ण करतो आणि त्याचा कामाचा रेकॉर्ड चांगला आहे. तथापि, अलीकडेच कंपनीने एक नवीन नियम लागू केला आहे, त्यामुळे तो त्रस्त झाला आहे.

त्या कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांच्या बाथरूम ब्रेकच्या वेळेची नोंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. एक दिवस बॉसने त्याला फोन करून सांगितले की त्याने दिवसभरात एकूण ५३ मिनिटे बाथरूममध्ये घालवली आहेत. कंपनीच्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना प्रत्येक बाथरूम ब्रेकसाठी जास्तीत जास्त ३० मिनिटांची परवानगी आहे. त्या कर्मचाऱ्याने ही मर्यादा ओलांडल्यामुळे त्याला अतिरिक्त वेळेसाठी ऑफिसमध्ये बसण्यास सांगितले गेले. तसेच त्याच्याकडे 53 मिनिटांच्या वेळेचा हिशेब मागण्यात आला.

कर्मचाऱ्याने सांगितले की, वॉशरूम ब्रेकची भरपाई करण्यासाठी त्याला अंदाजे ४० मिनिटे जास्त काम करण्यास आणि ऑफिसमध्ये थांबण्यास सांगितले जात होते. त्याला हा निर्णय अत्यंत विचित्र आणि अन्यायकारक वाटला. तो म्हणतो की, त्याच्या कामाबाबत तक्रार नाही, वर्क रोकॉर्डही चांगला आहे. मग कंपनी वॉशरुम ब्रेकचा हिशेब कसा मागू शकते?

त्याने हेही स्पष्ट केले की, वॉशरुममध्ये जाताना तो आपला मोबाईल फोन डेस्कवरच ठेवतो. तरीही कंपनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. कामाच्या गुणवत्तेवर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले नाही आणि सर्व कामे वेळेवर पूर्ण होतात. तरीही, अशा प्रकारच्या पाळत ठेवण्यामुळे त्याला मानसिक त्रास होत आहे.

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, मोठ्या संख्येने लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्या कर्मचाऱ्याला शक्य तितक्या लवकर नवीन नोकरी शोधण्याचा सल्ला दिला. लोकांचे मत होते की कंपनीचे हे वर्तन असामान्य आहे आणि व्यवस्थापन त्या कर्मचाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असावे. एका वापरकर्त्याने लिहिले की कंपनी त्याला नोकरी सोडायला लावण्यासाठी मुद्दाम लक्ष्य करत असावी. दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले की, अशा ठिकाणाहून लवकरात लवकर निघून जाणे चांगले. काहींनी असेही म्हटले की, असे कठोर आणि विचित्र नियम अनेकदा लहान कंपन्यांमध्ये पाहायला मिळतात.

या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची गोपनीयता आणि हक्कांबद्दल एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की, कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन त्यांनी स्वच्छतागृहात किती मिनिटे घालवली यावर नव्हे, तर त्यांच्या कामगिरीवर आधारित असले पाहिजे. यामुळेच हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.