पश्चिम बंगालच्या निकालाचं उत्तर काल मिळाले, गडबडीचा संशय असलेले 4 हजार EVM जळून खाक झाले! – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये दक्षिण कोलकात्यातील सरकारी इमारतीला आग लागून 4 हजार ईव्हीएम जळून खाक झाल्या. या ईव्हीएम नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आल्या होत्या. ज्या ईव्हीएमवर शंका आहे, गडबड झाल्याचा संशय आहे त्याच जळून खाक झाल्या. यावरून पश्चिम बंगालचा निकाल कसा लागला हे स्पष्ट होते, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ते पुढे म्हणाले, चार हजार ईव्हीएम एकाचवेळी कसे काय जळू शकतात? हे ईव्हीएम जळाले नाही तर जाळण्यात आले. भाजप सरकारने ही आग लावली. ईव्हीएम जळाले याचा अर्थ पुरावे नष्ट केले. निवडणुका झाल्या आणि ईव्हीएम जाळण्यात आले. जोपर्यंत मोदी शहांचे राज्य आहे तोपर्यंत हे असेच सुरू राहणार. कोणतीही निवडणूक पारदर्शक होणार नाही.

पश्चिम बंगालमध्ये चार हजार ईव्हीएम खाक, घोटाळ्याचे पुरावे नष्ट केल्याचा संशय

पश्चिम बंगालमध्ये लागलेला निकाल कुणालाही मंजूर नाही. ममता बॅनर्जी इतक्या वाईट पद्धतीने पराभूत होऊ शकत नाहीत. त्या भवानीपूरमध्ये पराभूत होऊ शकत नाहीत. बंगालमध्ये तिथे कांटे की टक्कर होती. पण निकाल कसा लागला याचे काल उत्तर मिळाले. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट कुठे आहे? किती दिवस बॅडमिंटन खेळत बसणार? जनतेचा आवाज ऐका, असेही राऊत यावेळी म्हणाले.

… तर ते सरदार पटेलांना पहिले गृहमंत्री आणि आंबेडकरांना पहिले कायदामंत्री मानायलाही तयार नसतील; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

यावेळी संजय राऊत यांनी मीनाक्षी नटराजन प्रकरणाचाही उल्लेख केला. मोदींनी आपल्या निवडणूक अर्जामध्ये अनेक गोष्टी लपवल्या, तरीही त्यांचा अर्ज स्वीकारला जातो. पण नटराजन यांचा राज्यसभेचा अर्ज रद्द केला जातो. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोगही ऐकायला तयार नाही. भाजपने या देशाची काय अवस्था करून ठेवली आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार, खासदार फोडत आहेत. दुसरे काही काम राहिले नाही का? आमच्या हातात सत्ता येईल तेव्हा जनता यांच्या मागे पळेल आणि रस्त्यावर फोडून काढेल, असेही राऊत म्हणाले.