कोण पंतप्रधान! कसले इंधन बचतीचे आवाहन!! भाजप प्रदेशाध्यक्षांचा राजेशाही दौरा! खासगी विमानाने निवडणुकीच्या प्रचाराला, दिमतीला 12 गाड्यांचा काफिला, आलिशान रिसॉर्टमध्ये साग्रसंगीत बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विजय जोशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मताला भाजपमध्येच कोणी किंमत देत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे तर मोदींनी केलेले इंधन बचतीचे आवाहन दररोज मोडीत काढतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रचारासाठी चव्हाण हे खासगी विमानाने लातूरला आले. हॉटेल ग्रँटमध्ये राजेशाही थाटात बैठक घेऊन चव्हाणांच्या गाड्यांचा काफिला नांदेडकडे रवाना झाला. नांदेडात आलिशान आरोवाना डिव्हाईन रिसॉर्टमध्ये साग्रसंगीत वातावरणात बैठक घेऊन चव्हाण हे खासगी विमानाने मुंबईला परतले.

आखाती प्रदेशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात सध्या अभूतपूर्व इंधन टंचाई निर्माण झाली आहे. डिझेल नसल्यामुळे ट्रॅक्टर मिळत नाही, त्यामुळे खरिपाची मशागत थांबली आहे. शेतकरी हवालदिल आहे. रुग्णवाहिकेला डिझेल नसल्यामुळे गर्भवतीला आपले बाळ गमवावे लागल्याची हिंगोली जिल्ह्यातील घटना तर ताजी आहे. पण सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. निवडणूक जिंकायचीच एवढे एकच काम सध्या सत्ताधाऱ्यांना उरले आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनालाही भाजप नेते हरताळ फासायला मागेपुढे पाहत नाहीत.

लातूर आणि नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे १० जून रोजी सकाळी मुंबईहून खासगी विमानाने आले. लातूर विमानतळावर आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ग्रामदैवत सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन चव्हाणांचा लांबलचक काफिला हॉटेल ग्रँट येथे पोहोचला. उमेदवाराच्या कृपेने बहुतांश मतदार सध्या पर्यटनावर आहेत. त्यामुळे या बैठकीला बोटावर मोजण्याएवढे मतदार उपस्थित होते. लातूरकरांचा शाही पाहुणचार घेऊन रवींद्र चव्हाणांचा काफिला विमानतळावर आला.

लातूरहून रवींद्र चव्हाण खासगी विमानानेच नांदेडला आले. नांदेड विमानतळावरही त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळाबाहेर १२ गाड्यांचा काफिला चव्हाणांच्या दिमतीसाठी सज्ज होता. खासदार अशोक चव्हाण, उमेदवार अमर राजूरकर, भाजपचे उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख, संजय कौडगे आदी हात जोडून स्वागतासाठी उभे होते. ‘आरोवाना डिव्हाईन’ या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या रिसॉर्टमध्ये तुरळक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून रवींद्र चव्हाण खासगी विमानाने मुंबईला परतले.