
हार्बर मार्गावरील टिळकनगर ते चेंबूर स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने शुक्रवारी ऐन ‘पीक अवर्स’ला लोकल सेवा तासभर ठप्प झाली. परिणामी, सकाळी पनवेल, बेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने जाणाऱ्या हजारो नोकरदारांचा जागोजागी खोळंबा झाला. लोकल गाड्यांच्या लागोपाठ रांगा लागल्याने अनेक प्रवाशांनी थांबलेल्या लोकलमधून खाली उड्या मारून रुळावरून पायपीट सुरू केली. ओव्हरहेड वायर दुरुस्त केल्यानंतर तासभराने सेवा सुरू झाली. मात्र दिवसभर गाड्यांचे वेळापत्रक बिघडले.
चेंबूर स्थानकाजवळ सकाळी 9 वाजून 16 मिनिटांच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटली आणि लोकलसेवा कोलमडली. खबरदारीचा उपाय म्हणून अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेकडील लोकल वाहतूक बंद ठेवण्यात आली. जवळपास तासभर लोकलसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला. ऐन पीक अवर्सला कार्यालयात पोहोचण्यासाठी घाई करण्याच्या वेळेतच हार्बरची सेवा बोंबलली. अनेक गाड्या रेल्वे स्थानकांपासून काही अंतरावर उभ्या राहिल्या. त्या गाड्यांतील प्रवाशांनी रुळावरून चालत रेल्वे स्थानक गाठले. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच हा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. यादरम्यान सीएसएमटी या मुख्य स्थानकासह वाशी, बेलापूर, चेंबूर, पनवेल, कुर्ला स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली. तासाभरानंतर ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करून लोकलसेवा सुरू करण्यात आली. मात्र दिवसभर गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने सायंकाळपर्यंत प्रवाशांची गैरसोय झाली.
शहापूर-आसनगावजवळ मालगाडीचे इंजिन बिघडले
आसनगाव स्थानकाजवळ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मालगाडीचे इंजिन बिघडले. त्यामुळे मध्य रेल्वची वाहतूक दीड तास ठप्प झाली. दरम्यान टिटवाळा, खडवली व वासिंद स्थानकावर लोकलसह एक्प्रेस थांबल्याने हजारो चाकरमानी आणि प्रवाशांची लटपंती झाली.
रविवारी वांद्रे ते गोरेगाव सेवा साडेचार तास बंद
पश्चिम रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि सिग्नल यंत्रणेच्या देखभाल कामासाठी रविवारी हार्बर मार्गावरील वांद्रे ते गोरेगाव स्थानकांदरम्यान साडेचार तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यानुसार सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तेथील लोकलसेवा पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे.

























































