
परळ येथील ‘महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल’च्या अस्थिव्यंगोपचार विभागाने गेल्या सहा महिन्यांत 200 जॉइंट सर्जरीज यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या विशेष कामगिरीमध्ये 50 हून अधिक ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ म्हणजेच गुडघे बदलणे आणि 75 हून अधिक यशस्वी ‘आर्थ्रोस्कोपी जॉइंट सर्जरीज’चा समावेश आहे. यामुळे शेकडो रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
अस्थिव्यंगोपचार व सांधेरोपण तज्ञ डॉ. क्लेविओ डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमने केलेल्या मेहनतीमुळे ‘महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल’च्या अस्थिव्यंगोपचार विभागाने वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे विभागाने केलेल्या एकूण शस्त्रक्रियांपैकी 100 हून अधिक शस्त्रक्रिया या ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने’अंतर्गत पूर्णपणे मोफत किंवा सवलतीच्या दरात करण्यात आल्या. त्यामुळे गरजू रुग्णांपर्यंत दर्जेदार आणि परवडणारे उपचार पोहचवणे शक्य झाल्याचे डॉ. क्लेविओ डिसोझा यांनी सांगितले. गुडघा आणि नितंबाच्या तीव्र संधिवाताने, तसेच गुडघा आणि खांद्याच्या अस्थिबंधांच्या दुखापतींनी ग्रस्त असलेल्या असंख्य रुग्णांना सांध्यांच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांची हालचाल क्षमता, स्वावलंबन आणि आत्मविश्वास परत मिळण्यास मदत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

























































