
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. विमानाच्या तपासणीत सीमाशुल्क विभागाने दुबईहून आलेल्या इंडिगोच्या विमानातून 4.26 कोटींचे सोने हस्तगत केले आहे. विमानाच्या शौचालयातील एका स्पीकर बॉक्समध्ये हे सोने लपवण्यात आले होते.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. इंडिगोचे विमान 6E-1478 दुबईहून अहमदाबाद विमानतळावर उतरताच, सीमाशुल्क हवाई गुप्तचर विभागाला सतर्क करण्यात आले. विमान अभियंत्यांच्या मदतीने, पथकाने शौचालयाच्या पुढील भागाची कसून तपासणी सुरू केली.
तपासणीदरम्यान, शौचालयाच्या स्पीकर बॉक्समध्ये काळ्या प्लास्टिक टेपने गुंडाळलेली दोन संशयास्पद पाकिटे सापडली. ही पाकिटे उघडली असता आत 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची एकूण 2,799.3 ग्रॅम वजनाची 24 बिस्किटे आढळली. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 4,26,89,325 इतकी आहे. या सोन्यावर कोणीही दावा केला नाही. सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत बेवारस मालमत्ता म्हणून हे सोने जप्त करण्यात आले आहे. याबाबत सखोल तपास सुरू आहे.




























































