पिशवीत गुंडाळलेल्या दोन दिवसांच्या चिमुकलीचा पुनर्जन्म; एका आईने कचराकुंडीत फेकले, दुसऱ्या आईने जीव वाचवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याणच्या एका कचराकुंडीत पिशवीत बांधून फेकलेले दोन दिवसांचे बाळ सापडले आहे. भटकी कुत्री लचके तोडणार तितक्यात एक महिला तेथे पोहोचल्याने सुदैवाने या बाळाचा जीव वाचला आहे. एका निर्दयी आईने फेकून दिलेल्या या चिमुकलीचा दुसऱ्या आईमुळे पुनर्जन्म झाला आहे. सध्या या बाळावर केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

चिकणीपाडा परिसरात राहणाऱ्या पूजा लवेकर या शुक्रवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घरातील कचरा टाकण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी विठ्ठल मंदिरासमोरील कचराकुंडीजवळ त्यांना एका पिशवीभोवती अनेक भटकी कुत्री फिरताना दिसली. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता पिशवीतून एका लहान बाळाचे डोके दिसून आले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तत्काळ पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये नवजात मुलगी जिवंत अवस्थेत आढळून आली. हा धक्कादायक प्रकार पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या चिमुकलीला बाहेर काढून सुरक्षित घरी नेले. तिची स्वच्छता करून तिला आंघोळ घातली आणि प्राथमिक स्वरूपाची काळजी घेतली. त्यानंतर अर्भक शांत झोपी गेले.

सीसीटीव्हीची तपासणी
सकाळी त्यांनी याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला ताब्यात घेतले आणि पुढील वैद्यकीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे. कोळसेवाडी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून या नवजात मुलीला कचराकुंडीत टाकून जाणाऱ्या व्यक्तीचा, तसेच तिच्या आईचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, चिमुकलीला कचराकुंडीत टाकणाऱ्या निर्दयी माता-पित्याविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.