
मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात नागौड राजघराण्याचा भाग असलेल्या परसमानिया गढीमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. माजी मंत्री आणि विद्यमान भाजप आमदार नागेंद्र सिंह यांचे पुतणे बाबा राजा यांच्या पत्नी योगिता सिंह यांच्यावर गोळीबार झाला आहे. यात त्यांच्या पोटात गोळी लागली. त्यांना तातडीने सतना येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्रथमोपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी रेवा येथील विंध्या रुग्णालयात पाठवण्यात आले.
टीव्ही 9 भारचवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, विंध्या रुग्णालयात रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटात अडकलेली गोळी यशस्वीरित्या काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. गढीमध्ये उपस्थित असलेल्या सुनीता सिंह यांनीच गोळी झाडल्याचे प्राथमिक तपासात कळते. सुनीता यांचे बाबा राजा यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पारसमनिया गढी आणि आसपासच्या परिसरात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. या हाय-प्रोफाईल गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.



























































