Megablock – उपनगरी रेल्वे मार्गावर उद्या जम्बो, मेगाब्लाॅक; पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवासात गैरसोय होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारच्या सुट्टीत बाहेर फिरण्याचा बेत आखणाऱ्या मुंबईकरांची उपनगरी रेल्वे मार्गावरील ‘ब्लॉक’मुळे गैरसोय होणार आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारच्या जम्बो व मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेने आपल्या कार्यक्षेत्रातील हार्बर लाईनवर वांद्रे ते गोरेगावदरम्यान जम्बो ब्लॉक जाहीर केला आहे, तर मध्य रेल्वेने दोन स्वतंत्र कामासाठी वेगवेगळ्या ब्लॉकचे शेड्युल जाहीर केले आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान आज मध्यरात्री 12.45 वाजता ब्लॉक सुरु होणार असून तो रविवारी पहाटे 3.45 वाजेपर्यंत राहणार आहे. या वेगवेगळ्या ब्लॉक काळात लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीत बदल केला असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने विविध अभियांत्रिकी आणि रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी हार्बर लाईनवर जम्बो ब्लॉकचे नियोजन केले आहे. वांद्रे ते गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी ब्लॉकबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-वांद्रे-सीएसएमटी आणि सीएसएमटी/पनवेल-गोरेगाव-सीएसएमटी/पनवेल हार्बर मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या रद्द राहतील. याव्यतिरिक्त पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-गोरेगाव-चर्चगेट दरम्यानच्या काही धिम्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील, असे अभिषेक यांनी स्पष्ट केले आहे.

याचदरम्यान रविवारी, 14 जून रोजी मध्य रेल्वेकडूनही हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान दिवसाचा ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान ‘डाऊन’ हार्बर मार्गावरील ब्लॉक सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 या वेळेत असेल, तर चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटीदरम्यान ‘अप’ हार्बर मार्गावरील ब्लॉक सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत असेल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.