
प्रणित मोरेच्या कॉमेडी शो मध्ये मृतदेहाचा अवमान केल्याप्रकरणी महिला डॉक्टर सेजल पवारवर केईएम रुग्णालयाने कारवाई केली आहे. केईएम रुग्णालयाने सेजल पवार हिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या कालावधीत सेजलला केईएम हॉस्पिटल, सेठ गोर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजचा परिसर किंवा वसतिगृहात प्रवेश दिला जाणार नाही.
व्हायरल व्हिडिओवरून झालेल्या वादानंतर सेजल पवारला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. प्रशासनाने तिच्या पालकांसोबत बैठकही घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, सेजल पवारने या घटनेबद्दल आपल्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संस्थेने पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तपास अहवालाच्या आधारे पुढील कारवाई ठरवली जाईल. सेजला नियमित वर्ग, प्रात्यक्षिक प्रशिक्षण, महाविद्यालयीन उपक्रम आणि इतर शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार नाही.


























































