नियम, अटी न लावता शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी द्या; रोहित पवार यांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुती सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी व नियमांमुळे बहुतांश शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. सरकारने टाकलेल्या जाचक अटी-शर्ती काढून अन्नदात्याला विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला शेतकऱयांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, आमदार रोहित पवार यांनी हातात संविधान असेल तर परवानगी दिली काय अन् नाही दिली काय, फरक पडत नाही, असे म्हणत ‘अभी नहीं तो कभी नहीं’ असे म्हणत आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी आमदार रोहित पवार यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली. आमदार पवार यांच्या मागण्यांबाबत मंत्रालयाकडे माहिती कळविणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पहिल्या दिवशी सरकारकडून या आंदोलनाबाबत काही निरोप आलेला नाही. त्यामुळे आंदोलन आणखी किती दिवस चालणार? सरकार काय भूमिका घेणार? आंदोलक काय भूमिका घेणार? याकडे शेतकऱयांचे लक्ष लागले आहे.