
नुवामा प्रायव्हेट टी-२० मुंबई महिला लीगच्या पहिल्या हंगामात ‘आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स’ संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्यांनी ‘ठाणे स्काय रायझर्स’चा आठ विकेट्स राखून पराभव केला.
११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सानिका चाळके हिने शानदार फलंदाजी करत ५१ चेंडूंमध्ये नाबाद ७४ धावा केल्या. तिच्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. सुरुवातीला हुमैरा काझीसोबत ३५ धावांची भागीदारी केल्यानंतर टायगर्सला एकामागोमाग दोन धक्के बसले, मात्र सानिकाने संयम राखत डाव सावरला. तिला फातिमा जाफरची चांगली साथ लाभली. जाफरने नाबाद ३५ धावा करत तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची नाबाद भागीदारी उभारली. टायगर्सने हा सामना १५ षटकांतच जिंकला.
तत्पूर्वी टायगर्सच्या अचूक गोलंदाजीसमोर रायझर्स संघ २० षटकांत ९ बाद ११३ धावांपर्यंत मर्यादित राहिला. वृषाली भगत (३२), मानसी पाटील (२५) आणि खुशी भाटिया (२१) यांनी काहीसा प्रतिकार केला. टायगर्सकडून मनाली दक्षिणी आणि बतुल परेरा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. या विजयासह टायगर्सने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले असून, त्यांचा सामना सोबो मुंबई फाल्कन्सविरुद्ध होणार आहे.






























































