दिग्गज जिल्हा बँक निवडणुकीतून बाहेर; आमदार संजना जाधव, चव्हाण, शिरसाठ, मानेंसह 45 जणांचे अर्ज उडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत कन्नडच्या आमदार संजना जाधव, विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार सुहास शिरसाठ, आमदार अनुराधा चव्हाण, माजी खासदार स्व. साहेबराव पाटील यांच्या पत्नी इंदुमती पाटील, कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील, माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर, माजी आमदार अण्णासाहेब माने या दिग्गजांसह ४५ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या ४ जुलै रोजी होत असून, या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. २१ संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १५८ उमेदवारांनी २१४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जाची छाननी सोमवारी झाली. या छाननीदरम्यान दाखल आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली याच दिवशी सुनावणी झाली. या सुनावणीचा छाननीत अर्ज अवैध ठरलेल्या अर्जाचा निकाल आज मंगळवारी जाहीर करण्यात आला. या सुनावणीत दिग्गजांचे अर्ज उडाले आहेत. अर्ज बाद ठरलेल्या उमेदवारांची संख्या ४५ आहे. अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांचा अर्ज सोयगाव येथील जिल्हा बँकेची शाखा ही त्यांच्या मालकीच्या जागेत भाडेतत्त्वार घेण्यात आली असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरला आहे. अब्दुल समीर यांच्या उमेदवारीवर काकासाहेब फरकाडे यांनी आक्षेप घेतला होता.

२३ जूननंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्याच ताब्यात राहावी, असे मनसुबे आखून अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, काही दिग्गज नेत्यांचे, त्यांच्या नातेवाईकांचे अर्ज अवैध ठरले आहेत. सभासदाचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण नसणे, अर्जात त्रुटी असणे, ऑडिट वर्ग क असणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये ४५ जणांचा समावेश असून, १६९ जणांचे अर्ज वैद्य ठरले. उमेदवारी अर्ज परत घेण्याचा कालावधी ९ ते २३ जून असा असून, २३ जूननंतर या निडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. वैयक्तिक सभासद मतदारसंघात अब्दुल जावेद अब्दुल वाहेद यांचा एकमेव अर्ज दाखल होता, तोही अर्ज अवैध ठरला आहे. या मतदारसंघात एकही उमेदवार नसल्याने ही जागा रिक्त राहणार आहे.

यांचे उमेदवारी अर्ज ठरले अवैध

प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. स. सेवा सहकारी संस्था फुलंब्री तालुक्यातून रामेश्वर चोपडे, आमदार अनुराधा चव्हाण यांचा अर्ज अवैध ठरला असला तरीही महिला प्रतिनिधी मतदारसंघातील त्यांचा दुसरा अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे त्या या निवडणुकीत कायम आहेत. सोयगाव तालुक्यातून जयप्रकाश चव्हाण, कन्नडमधून आमदार रंजना चव्हाण, प्रीती पवार, मनोज देशमुख, गंगापूरमधून इंदुमती साहेबराव पाटील डोणगावकर, रूपचंद गाडेकर, वैजापूर तालुक्यातील मंदाबाई सोनवणे, पटेल परवीन नबी यांचा अर्ज बाद ठरला आहे. बिगर शेती संस्था मतदारसंघातून अण्णासाहेब माने, अश्विनी मडके, प्रणिकेत पाटील, खान नुसरत अ. रहेमान कृषी पणन संस्था मतदारसंघातून माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर अब्दुल सत्तार, रितेश मुनोत, काकासाहेब फरकाडे यांचे अर्ज बाद ठरले आहेत. वैयक्तिक मतदारसंघातून अब्दुल समीर यांचा दुसरा अर्जही अवैध ठरला आहे. याच मतदारसंघातील गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या पत्नी सुवर्णा जाधव, शोभा निकम, मंदाबाई राठोड, शीतल निकम, पटेल परवीन नबी, पूनम मगर, मीनाबाई जाधव, आशाबाई अकोलकर, ज्योतीबाई दाढे, अश्विनी मडके, छायाबाई थोट, चंद्रकला घुले, रतनप्रभा बोरसे यांचा अर्ज बाद झाला आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मतदारसंघात २ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये रूपचंद गाडेकर, प्रदीप शिंदे यांचा समावेश आहे. तसेच इतर मागासवर्गीय सदस्य मतदारसंघात सुवर्णा जाधव, विशाल नांदरकर, पूनम मगर, सुहास शिरसाठ, दीपक जाधव तसेच माजी आमदार नितीन पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. शिरसाठ हे विधान परिषद निवडणुकीतील भाजपचे उमेदवार आहेत. विमुक्त जाती-भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघात मनोज राठोड, मंदाबाई राठोड, स्वरूपचंद कुकलारे, मधुकर हांडे या चार उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक समृत जाधव हे काम पाहत असून, त्यांना सहायक निबंधक किरण चौधरी, व्ही. पी. रोडगे हे सहाय्य करत आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची येत्या ४ जुलै रोजी निवडणूक होत आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत असून, ११३ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारीख २३ जूननंतर स्पष्ट होणार आहे. १ हजार ११२ मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.