
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 जून रोजी एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषवण्याच्या बाबतीत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढला आहे. मात्र, भाजपकडून नरेंद्र मोदी आणि पंडित नेहरू यांच्यात करण्यात आलेल्या या तुलनेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मोदींनी आज कदाचित स्वयंघोषित मैलाचा दगड पार केला असेल. पण ते देशाच्या गळ्यातील धोंडा आहेत. कारण मोदींच्या नेतृत्वात देशात लोकशाहीची हत्या होत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.
जयराम रमेश यांनी आपल्या सोशल मीडिया साईट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी ऐतिहासिक संदर्भांचा दाखला देत सांगितले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी जवाहरलाल नेहरू हिंदुस्थानचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी अशा एका शानदार मंत्रिमंडळाचे नेतृत्व केले, जे जगाने क्वचितच पाहिले असेल. स्वातंत्र्यानंतरच्या पुढील पाच वर्षांतच आधुनिक देशाची खरी निर्मिती झाली. या काळात 560 हून अधिक संस्थाने अत्यंत शांततापूर्ण मार्गाने संघराज्यात विलीन करण्यात आली. याच काळात देशाच्या संविधानावर सखोल चर्चा होऊन ते स्वीकारण्यात आले, जमीनदारी पद्धत नष्ट करण्यात आली आणि अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातींसाठी आरक्षण लागू करण्यात आले. याशिवाय, देशात अनेक बहुउद्देशीय सिंचन आणि ऊर्जा प्रकल्प सुरू झाले, तर अणुऊर्जेसह विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. ज्यामुळे हिंदुस्थान जागतिक पातळीवर एक महत्त्वपूर्ण शक्ती म्हणून उदयास आला. तसेच, देशातील सर्व प्रौढांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी 17 कोटी नोंदणीकृत मतदारांची यादी तयार करून, ऑक्टोबर 1951 ते फेब्रुवारी 1952 दरम्यान स्वतंत्र देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पडली.
जवाहरलाल नेहरू 15 अगस्त, 1947 को भारत के प्रधानमंत्री बने। उन्होंने एक ऐसी असाधारण कैबिनेट का नेतृत्व किया, जैसी मिसालें दुनिया में बहुत कम देखने को मिलती हैं। अगले पांच वर्षों में आधुनिक भारत आकार लेने लगा।
560 से अधिक रियासतों का शांतिपूर्ण तरीके से भारतीय संघ में विलय किया…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 10, 2026
जयराम रमेश यांनी स्पष्ट केले की, स्वातंत्र्यानंतर 1947 ते 1952 या काळात नेहरू पंतप्रधान असताना सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, सी. राजगोपालाचारी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासारख्या महान नेत्यांनी देशाच्या जडणघडणीत आणि यशात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधान मोदींच्या नेहरूंशी होणाऱ्या तुलनेवर आक्षेप घेत जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या मनात नेहरूंबद्दल प्रचंड आकस आणि द्वेष आहे. मोदींनी आज कदाचित स्वयंघोषित मैलाचा दगड पार केला असेल. पण ते देशाच्या गळ्यातील धोंडा आहेत. कारण मोदींच्या नेतृत्वात देशात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुढे बोलताना जयराम रमेश यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली की, आज देशातील वैज्ञानिक दृष्टिकोन नष्ट केला जात असून, त्यामुळे आपल्या शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त होत आहेत; हे अलीकडील नीट (NEET) आणि सीबीएसई (CBSE) घोटाळ्यांवरून स्पष्ट झाले आहे. तसेच, सरकारच्या खाजगीकरणासारख्या चुकीच्या धोरणांमुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गांसाठी असलेली आरक्षण व्यवस्था कमकुवत झाली अशीही टीका त्यांनी केली.
पंडित जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी यांच्यातील जनमानसातील फरक स्पष्ट करताना जयराम रमेश म्हणाले की, नेहरू 1952, 1957 आणि 1962 अशा तिन्ही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आले होते. याउलट, 2024 च्या निवडणुकीत मोदींना स्वतःच्या बळावर साधे बहुमतही मिळवता आलेले नाही. स्वतःला पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांना भाजप संसदीय पक्षाला बाजूला सारून घाईघाईने एनडीएची (NDA) बैठक बोलवावी लागली. त्यामुळे 2024 चा जनादेश हा निश्चितच मोदींच्या बाजूने नव्हता, असा टोलाही त्यांनी लगावला.


























































