
डिजिटल क्रांतीचा देश म्हणून ओळख असलेल्या स्वीडनमध्ये एक कौतुकास्पद आणि क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून स्वीडनमधील संपूर्ण शाळांमध्ये मोबाईल वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्यांचा स्क्रीन टाईम कमी करून पुस्तकांद्वारे शिक्षणावर भर दिला जाणार आहे.
गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये लिहिण्याची आणि वाचण्याची क्षमता कमी झाल्याचे दिसून आले आहे. एका अहवालानुसार, नववीच्या 24.3 टक्के विद्यार्थ्यांना वाचण्याचा प्राथमिक स्तरही गाठता आला नाही. त्यामुळे डिजिटल माध्यमांऐवजी जुन्या, पारंपरिक पद्धती आणि पुस्तके मुलांच्या भविष्यासाठी अधिक फायदेशीर आहेत, या निष्कर्षावर सरकार पोहोचले, असे स्वीडनच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष जोआर फॉर्सेल यांनी सांगितले. वर्गात आल्यानंतर विद्यार्थ्यांना पह्न एका बॉक्समध्ये जमा करावे लागतात. तास संपल्यानंतर ते त्यांना परत दिले जातात. सरकारकडून शाळांमध्ये नवीन पाठय़पुस्तके आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शिका खरेदी करण्यासाठी 59 दशलक्ष डॉलरचा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्वीडनसह डेन्मार्क, फिनलँड यांसारख्या शेजारील देशांनीही असेच निर्बंध लागू केले आहेत. स्पेन, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील लॉस एंजेलिस स्कूल डिस्ट्रिक्टनेही शाळांमधील मोबाईल स्क्रीन टाईमवर मर्यादा आणल्या आहेत.
स्वीडनमधील दोन वर्षांखालील मुलांसाठी डिजिटल साहित्याच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. 2028 पर्यंत संपूर्ण पुस्तकांवर आधारित नवीन अभ्यासक्रम या मुलांसाठी लागू केला जाईल. केवळ शाळेतच नाही, तर घरातही पालकांनी मुलांसमोर आदर्श ठेवावा आणि घरात स्क्रीन-मुक्त क्षेत्र तयार करावेत असा सल्ला सार्वजनिक आरोग्य संस्थेने पालकांना दिला आहे. सरकारच्या या निर्णयाला काही जणांनी विरोध दर्शवला आहे. स्विडीश एडटेक इंडस्ट्रीजच्या म्हणण्यानुसार, भविष्यातील 90 टक्के नोकऱया या डिजिटल काwशल्यांवर आधारित आहेत. त्यामुळे या बंदीमुळे मुले मागे पडू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
































































