
अमेरिका आणि इराणमधील लष्करी संघर्ष कमालीचा वाढला असून दोन्ही देशांनी एकमेकांवर भीषण हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकन लष्कराकडून क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी इराणने अमेरिकेचे एक अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. या घटनेचा बदला घेण्यासाठी अमेरिकन सैन्याने रात्री होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणी शहरांवर मोठा हल्ला चढवला. अमेरिकेने हा हल्ला संपल्याची घोषणा करताच, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) प्रत्युत्तरादाखल बहरीनमधील अमेरिकेच्या नौदलाच्या पाचव्या ताफ्याला ड्रोनद्वारे लक्ष्य केले. तसेच जॉर्डनमधील एका अमेरिकन लष्करी तळावरही इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) या कारवाईचे समर्थन करताना सांगितले की, लष्कराने स्वसंरक्षणासाठी आणि हेलिकॉप्टर पाडल्याच्या प्रत्युत्तरात हे उत्तर दिले आहे. अमेरिकन लढाऊ विमानांनी आणि नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली, जमिनीवरील नियंत्रण केंद्रे आणि निगराणी रडार स्थळांना लक्ष्य केले. सेंटकॉमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून आपले हल्ले संपल्याचे जाहीर केले. मात्र, या कारवाईमुळे इराणमध्ये तीव्र संताप उसळला आणि काही तासांतच इराणच्या आयआरजीसीने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. आयआरजीसी नौदलाने पहाटे अडिच वाजता बहरीन येथील अमेरिकेच्या पाचव्या नौदल तळावर ड्रोन हल्ला केला.
इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सरकारने खोट्या सबबीखाली जास्क, सिरिक आणि केशममधील अनेक ठिकाणी हल्ले केले असून यामध्ये सिरिकमधील एका दूरसंचार टॉवरचे आणि दोन पाण्याच्या टाक्यांचे नुकसान झाले आहे. इराणने इशारा दिला आहे की, जर अमेरिकेचे हल्ले सुरूच राहिले तर यापेक्षाही अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. या इराणच्या हल्ल्यानंतर बहरीनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सरकारने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. या प्रतिशोधात्मक हल्ल्यांच्या नवीन लाटेमुळे आखाती देशांमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आणि धोकादायक वळणावर पोहोचली आहे.





























































