इंदिरा गांधींनी देशाची प्रतिष्ठा जपली! शरद पवार यांची नाव न घेता गिरीश महाजनांना सणसणीत चपराक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या 42 व्या स्मृतिदिनानिमित्त पंजाबच्या अमृतसरमध्ये आयोजित कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. महाजन यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा दिवस हा काळा दिवस होता असे म्हणत तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही टीका केली. तसेच भिंद्रनवाले आणि त्याच्या सहकाऱ्यांना शहीद असे संबोधले. त्यावरून त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. आता याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनीही नाव न घेता महाजनांना चपराक लगावली आहे. इंदिरा गांधी आणि काँग्रेसबाबत महाजन यांनी केलेले विधान आपल्याला मंजूर नसल्याचे पवार म्हणाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

इंदिरा गांधी देशाच्या स्वातंत्र्यानंतरही संघर्ष करत राहिल्या. जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवायला अतिशय मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींपैकी त्या एक होत्या. त्यांनी नेहमी देशाची प्रतिष्ठा जपली. त्या संदर्भात कधीही तडजोड केली नाही, असे शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी रशियाची राजधानी मॉस्कोत घडलेल्या प्रसंगाचाही दाखला दिला.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मॉस्कोला गेले होते. रशिया हा आपला मित्रदेश, पण तिथे गेल्यानंतर त्यांच्या स्वागताला काही अधिकारी उपस्थित होते. साधारणत: एखाद्या देशाचा पंतप्रधान दुसऱ्या देशात जातो तेव्हा त्याचे स्वागत त्याच दर्जाच्या व्यक्तीकडून केले जाते अशी पद्धत असते. पण इंदिरा गांधींच्या बाबतीत ते घडले नाही. त्यामुळे त्यांनी रशियाच्या पंतप्रधानांची भेट घेण्याऐवजी हिंदुस्थानी राजदूतांच्या घरी जाण्यास प्राधान्य दिले. या भागात राहणाऱ्या हिंदुस्थानी कुटुंबातील लहान मुलांना बोलावून इंदिरा गांधी त्यांच्यात रमल्या. आपले काही चुकले असावे असे वाटून राजदूतांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, तुमचे नाही तर रशियाच्या पंतप्रधानांचे चुकले. मी इथे इंदिरा गांधी म्हणून नव्हे तर 40 कोटी लोकांच्या देशाची पंतप्रधान म्हणून आले. त्यांची अप्रतिष्ठा होत असेल तर मला अशा स्वागतामध्ये स्वारस्य नाही. हे इंदिरा गांधी यांचे कर्तृत्व आणि नेतृत्वगुण होते, असे शरद पवार म्हणाले.

‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हा काळा दिवस, गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने वाद; इंदिरा गांधी आणि लष्करावरही टीका केल्याने देशभरात संताप

इंदिरा गांधी, राजीव गांधींनी शिखांवर अत्याचार केले आणि काँग्रेसने शिखांचे नुकसान केले, असे विधान गिरीश महाजन यांनी केले. याचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि देशाच्या रक्षणात शीख समाजाचे योगदान खूप मोठे आहे. काही लोक चुकीचे होते, पण देशातील 98 टक्के शीख या देशासाठी पडेल ती किंमत द्यायला यतार आहेत. देशाच्या शेतीचा, अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्याचे काम शीख समाजाने घाम गाळून केले हे आपण कधीही विसरणार नाही. सैन्यामध्येही पडेल ती जबाबदारी घ्यायला शीख समाज पुढे असतो याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. पण काही लोकांनी तरुण मुलांच्या मनात चुकीची विचारधारा रुजवून त्यांना वेगळ्या मार्गावर न्यायाचा प्रयत्न केला. त्या मार्गावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, लष्करप्रमुख जनरल अरुण श्रीधर वैद्य आणि नंतर राजीव गांधी यांचीही हत्या झाली.

महाराष्ट्राचे मंत्री पंजाबमध्ये जाऊन शिखांचे शिरकाण काँग्रेसच्या विचारांच्या लोकांनी केले ही भूमिका मांडतात. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. देशाच्या स्वातंत्र्यात त्यांचेही मोठे योगदान आहे. नेहरूंनी आपल्या आयुष्यातील उमेदीचा काळ संबंध देशासाठी दिला. इंदिरा गांधी यांनी देशाच्या रक्षणासाठी वाटेल ते केले. पाकिस्तानला धडा शिकवला. बांगलादेशची निर्मिती केली. नेहरू कुटुंबाचा त्याग भारतीय कधी विसरू शकत नाहीत. त्यांची तुलना कुणाच्याबरोबर होऊ शकत नाही. भारत छोडो आंदोलनावेळी नेहरूंसह काँग्रेस नेत्यांना नगरच्या तुरुंगामध्ये अनेक वर्षे ठेवण्यात आले. त्यांच्या त्यागाचा इतिहास आपण कधीही विसरू शकत नाही, असेही शरद पवार म्हणाले.

नेहरूंचं कर्तृत्व, त्यांचं योगदान याची तुलना होऊ शकत नाही; नेहरूंशी मोदींची तुलना करणाऱ्या नेत्यांचा शरद पवारांनी घेतला समाचार