वाढदिवस साजरा करणं पडलं महागात, केकमधील सजावटीसाठी वापरलेल्या धातुच्या पिना गेल्या चिमुकल्याच्या पोटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपला तिसरा वाढदिवस साजरा करणं एका चिमुकल्याला महागात पडलं. त्यांचं कारण ठरला बेकरी वाल्याने बनवलेला केक. बेकरीवाल्यांनी सजावटीसाठी केकमध्ये धातुच्या पिना घातल्या होत्या. केक खाल्ल्यानंतर मुलाच्या पोटात त्या पिना गेल्या आणि मोठं संकट उद्भवलं.

हिरानंदानी इस्टेट परिसरात राहणाऱ्या जीवशास्त्राच्या शिक्षिका स्नेहा शेलार यांनी हा धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. “माझ्या मुलाच्या वाढदिवसाचा केक आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव ठरला,” असे त्यांनी म्हटले आहे.

३१ मे रोजी रेयांशच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त स्पायडरमॅन थीमवर आधारित पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी खास बॉलिंग अ‍ॅली डिझाइनचा केक तयार करण्यात आला होता. रेयांशचे कुटुंब आणि त्याचे मित्र या पार्टीसाठी आले होत, पण या घटमुळे सगळेच घाबरून गेले.

स्नेहा शेलार यांच्या आरोपानुसार, ठाण्यातील एका बेकरीने केकवरील चॉकलेट बॉलिंग पिन्स उभ्या ठेवण्यासाठी त्यामध्ये धातूच्या तारांचा वापर केला होता. मात्र या बाबत कुटुंबाला कोणतीही पूर्वकल्पना किंवा इशारा देण्यात आला नव्हता. विशेष म्हणजे हा केक लहान मुलांसाठी असल्याची माहिती बेकरीला आधीच देण्यात आली होती.

पार्टीतील काही मोठ्या मुलांना केकमधील सजावटीच्या वस्तूंमध्ये धातूच्या पिना आढळल्या, तेव्हा ही बाब समोर आली. या मुलांनी लागलीच ही बाब पालकांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा रेयांशने अशा पिना गिळल्या असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

यानंतर कुटुंबीयांनी तातडीने रेयांशला रुग्णालयात नेले. एक्स-रे तपासणीत त्याच्या लहान आतड्यात दोन धातूच्या पिना अडकल्या असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया टाळण्याचा सल्ला दिला, कारण त्या पिना आतड्यांपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे नैसर्गिकरीत्या त्या शरीराबाहेर पडण्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुमारे ४८ तासांच्या प्रतीक्षेनंतर दोन्ही धातूच्या पिना सुरक्षितपणे शरीराबाहेर पडल्या आणि रेयांशचा जीव वाचला. मात्र, या काळात कुटुंबीयांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.

या घटनेनंतर स्नेहा शेलार यांनी पालकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. केक ऑर्डर करताना त्यामध्ये कोणतेही लपवलेले आधार साहित्य वापरण्यात आले आहे का, तसेच सजावटीचे सर्व भाग पूर्णपणे खाण्यायोग्य आहेत का, याची खात्री करून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

दरम्यान, कुटुंबीयांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र हे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अखत्यारीत येत असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे एफडीए अधिकाऱ्यांनी केक किंवा चॉकलेट पिन्सचा नमुना उपलब्ध नसल्यामुळे चौकशी करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.