
मोदी सरकारच्या ‘हर घर नल मे जल’ या योजनेचा शहापूरात अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे. पापणे ग्रामपंचायत हद्दीतील काजळविहीर येथील कातकरी वाडीतील ५७ कुटुंबांवर पाणी संकट कोसळले आहे. या भीषण पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज थेट शहापूर पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ या घोषणा देत महिलांनी पंचायतच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला.
काजळविहीर येथील कातकरी वाडीमध्ये अजूनपर्यंत नळ पाणीपुरवठा योजना आलीच नाही. त्यामुळे कातकरी महिलांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यांपूर्वी कातकरी वाडीला नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत पापणे ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला. त्यानंतर फक्त आठ दिवसांत पाणीपुरवठा देण्याबाबत आश्वासनही देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात पाण्याचा टिपूसही नसल्याने कातकरी वाडीतील कुटुंबांत संताप पसरला आहे.
रखरखीत उन्हात आंदोलन
नळ बसवण्याबाबत कोणतेही पाऊल उचलले नसल्याने कातकरी वाडीतील महिलांनी थेट पंचायत समिती गाठली. हंडा, कळशी, डोक्यावर घेऊन महिलांनी तब्बल २ तास रखरखीत उन्हात ठिय्या मांडला.
अधिकाऱ्यांचे आश्वासन
गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी मंत्रालयीन बैठकीसाठी गेले असल्याचे सांगण्यात आल्यानंतर महिलांनी संताप व्यक्त केला. सहाय्यक गटविकास अधिकारी गुलाबसिंग बसावे यांनी कातकरी वाडीला तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर संतप्त महिलांनी मोर्चा मागे घेतला.





























































