
जळकोट येथील शेतकरी रामराव सटवाजी शिंदे वय 75 वर्षे यांच्या अंगावर घराची भिंत पडून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आगामी पेरणीची तयारी म्हणून घरात बी बियाणांची जुळवाजुळव करत असताना ही दुर्घटना घडली.
8 जून रोजी पेरणीच्या लगबगीत घरात बी बियाण्यांच्या जमवाजमवीचे काम करीत असताना पावसात भिजलेली व फुगलेली घराची भिंत रामराव शिंदे यांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. ते भिंतीखाली दबले गेले होते. पती दिसत नाहीत हे पाहून त्यांच्या पत्नीने व सोबत काम करणाऱ्या व्यक्तीने जोरदार आरडाओरडा केल्याने भिंतीखाली दबलेल्या रामराव सटवाजी शिंदे भिंतीखालून काढण्यात आले आणि लगेच ग्रामीण रुग्णालय, जळकोट येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचा एक पाय पूर्णतः मोडला होता व दुसरा पाय मोठ्या प्रमाणात फ्रॅक्चर झाला होता. हातही मोडला होता व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पुढील उपचारासाठी त्यांना उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. उदगीर येथून त्यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. शव विच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह जळकोटला पाठवण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे. रामराव शिंदे हे शेतीनिष्ठ शेतकरी होते व ग्रामीण भागातील तंटामुक्तीत त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. ते माजी ग्रामपंचायत सदस्य होते. ते घरातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात यावी व त्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.






























































