
गोदावरी नदीचा पवित्र किनारा, धार्मिक स्थळांचा वारसा आणि अध्यात्मिक वातावरण—एकीकडे ही ओळख; तर दुसरीकडे त्याच परिसरात झपाट्याने वाढत चाललेली व्यसनाधीनता. राक्षसभुवन, पंचाळेश्वर, पुरुषोत्तमपुरी, गुंज, मंजरथ या धार्मिक स्थळांच्या परिसरात दारूच्या बाटल्या, बिअरचे कॅन, तंबाखूजन्य पदार्थांचे अवशेष आणि अमली पदार्थांच्या खुणा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. परिणामी, “उडता गोदाकाठ” अशी धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांत गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात—आणि अनेक ठिकाणी अनधिकृत—वाळू उपसा सुरू आहे. बहुतांश ठिकाणी हा उपसा रात्रीच्या वेळी केला जातो. विरोध होऊ नये म्हणून काही टोळक्यांकडून सुरक्षा कवच उभारले जाते, ज्यासाठी मोठा मोबदला दिला जातो. या पैशाच्या जोरावर दारूच्या नशेत तरुणांची टोळके तत्काळ उपलब्ध होत असल्याने वाळू उपसा बिनदिक्कत सुरू राहतो. भीतीपोटी गावकरीही विरोध करण्यास टाळाटाळ करतात.
या व्यवसायातून अचानक मोठा पैसा हातात आल्याने ग्रामीण भागातील एक पिढी चैनीकडे आणि व्यसनाकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. मेहनतीशिवाय मिळालेल्या पैशामुळे युवकांमध्ये दारू, गुटखा, तंबाखू आणि इतर नशेच्या पदार्थांचे आकर्षण वाढले आहे. सामाजिक भान कमी होत असून, गोदावरीचा काठ जणू ‘ढाबा’ बनला आहे आणि पवित्र मंदिर परिसरही मद्यप्राशनाची ठिकाणे होत आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात, त्याच परिसरात रिकाम्या बाटल्या आणि नशायुक्त पदार्थांचे अवशेष आढळतात. यामुळे धार्मिक स्थळांची पवित्रता धोक्यात येत असून पर्यावरणावरही विपरीत परिणाम होत आहे.
स्थानिकांच्या मते, रात्रीच्या वेळी युवक नदीकाठावर मोठ्या संख्येने जमतात. काही ठिकाणी पार्ट्या आणि मद्यप्राशन खुलेआम सुरू असते. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. धार्मिक पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या पट्ट्याची प्रतिमा मलिन होत असून, पोलीस व प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पूर्वी गोदाकाठावर नवसागर व नासलेल्या गुळापासून हातभट्टी दारू तयार केली जात असे. मात्र आता या भट्ट्यांची जागा ‘कॅप्सूल’ने घेतली आहे. कोमट पाण्यात कॅप्सूल टाकताच काही क्षणांत तीव्र नशा देणारे पेय तयार होते. यासोबत खोकल्याच्या सिरपच्या बाटल्या, व्हाईटनर, नेल पॉलिश, फेविकोल यांसारख्या पदार्थांचाही नशेसाठी वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
मंजरथला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. गरुड पुराणापासून शिवपुराणापर्यंत अनेक ग्रंथांमध्ये या स्थळाचे महत्त्व वर्णन केले आहे. मात्र अलीकडे या पावित्र्याला तडा जाताना दिसतो. रात्रीच्या वेळी गोदावरी पात्रात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ सुरू असतो. मंदिराच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच दिसून येतो. – राजेंद्र आनंदगावकर, माजी सरपंच, मंजरथ (बीड)
“गोदावरीमुळे हा पट्टा सधन होता; मात्र बेसुमार वाळू उपशामुळे नदीचे वैभव हरवले. शेतीपेक्षा वाळू व्यवसाय आकर्षक वाटू लागला. त्यामुळे स्वैराचार, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी वाढली. दिवसा खून होण्याच्या घटना घडत आहेत. वाळूला सोन्याचा भाव आला, आणि दारू सहज उपलब्ध झाली—यामुळे अख्खी पिढी बरबाद होत आहे. शासनकर्त्यांचे दुर्लक्ष गंभीर परिणाम घडवू शकते.” – ॲड. अजित देशमुख, ज्येष्ठ सामाजिक नेते, बीड






























































