उकाड्यापासून वाचण्यासाठी पाण्याच्या टाकीवर झोपला, झोपेत कुशीवर वळल्याने खाली कोसळला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथील कुतुबशेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भीषण उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आणि थंड हवेसाठी हा तरुण रात्रीच्या वेळी रेल्वे क्वार्टरच्या दरम्यान असलेल्या एका उंच पाण्याच्या टाकीवर जाऊन झोपला होता. मात्र झोपेत असताना अचानक कुस बदलताना त्याचा समतोल पूर्णपणे बिघडला आणि तो इतक्या उंचावरून थेट खाली जमिनीवर कोसळला. डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, बुधवारी सकाळी जेव्हा स्थानिक लोकांनी पाण्याच्या टाकीजवळ या तरुणच रक्ताळलेला मृतदेह पाहिला, तेव्हा तिथे एकच गोंधळ उडाला आणि पाहता पाहता घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. ग्रामस्थांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच कुतुबशेर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना पाण्याच्या टाकीच्या अगदी वर एक घोंगडी आणि चादर पडलेली आढळली. यावरून हा तरुण रात्री तिथेच अंथरूण मांडून गाढ झोपला होता, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला आहे.