
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील १० जनपथ येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. ही भेट तृणमूल काँग्रेसमधील नेत्यांचे लागोपाठ होत असलेले राजीनामे आणि पक्षांतर्गत सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर झाली, अशी चर्चा आहे. यापूर्वी मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी नवी दिल्लीत काँग्रेस संसदीय दल प्रमुख सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता आणि सुमारे २० लोकसभा खासदारांनी बंड केल्याच्या चर्चांदरम्यान काही खासदारांनी राजीनामे दिले आहेत. बंडखोर तृणमूल खासदार काकोली घोष दस्तिदार यांनी एएनआयकडे या गोष्टीला दुजोरा दिला की, २० खासदारांच्या एका गटाने लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकृत विनंती केली आहे. त्या म्हणाल्या, “आम्ही २० खासदारांनी अध्यक्षांकडे स्वतंत्र बसण्याची विनंती केली आहे आणि आम्ही पश्चिम बंगालच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने काम करू.”
या बंडखोर खासदारांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे पश्चिम बंगाल निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव तसेच मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतल्याने, हा गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार, म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार, बंडखोर खासदारांना अपात्रतेपासून वाचण्यासाठी २/३ बहुमतासह इतर पक्षात विलीनीकरण करणे आवश्यक आहे.
दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांची भेट का घेतली आणि दोन्ही त्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, टीएमसी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो. याचबाबत दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.




























































