
गोव्यात फिरण्यासाठी आलेल्या केरळमच्या तब्बल २८ पर्यटकांना अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार समोर आली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने बुधवारी दिली.
हे सर्व पर्यटक गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी आले होते. त्यांचा मोठा ग्रुप होता. त्यांनी जुन्या गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केले होते, ज्यानंतर त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा त्रास सुरू झाला, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी पत्रकारांना दिली.
त्यांच्यावर मंगळवारी रात्री रुग्णालयात उपचार करण्यात आले. या २८ पर्यटकांपैकी तिघांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु त्यांनी वैद्यकीय सल्ल्याविरोधात जात स्वतःहून डिस्चार्ज घेतला, असे त्यांनी सांगितले. रुग्णालय सोडताना सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर होती, असेही त्यांनी पुढे सांगितले.



























































