
चीनने तैवानच्या पूर्व दिशेला सुरू केलेल्या सागरी अंमलबजावणी मोहिमेवर तैवानने तीव्र शब्दांत टीका केली आहे. बीजिंगकडून आपल्या अधिकारक्षेत्राचा विस्तार करण्याचा आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप तैवानने केला आहे. ‘द तैपेई टाइम्स’च्या वृत्तानुसार, ज्या सागरी क्षेत्रात चीनला कोणताही कायदेशीर अंमलबजावणीचा अधिकार नाही, तिथे चीनकडून बेकायदेशीरपणे अधिकार गाजवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या पावलाचा तीव्र निषेध केला आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
‘द तैपेई टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या परिवहन मंत्रालयाने तैवानच्या पूर्वेकडील समुद्रात विशेष सागरी कायदा अंमलबजावणी मोहीम राबवण्याची घोषणा केल्यानंतर हा वाद निर्माण झाला. चीनची वृत्तसंस्था ‘शिनहुआ’ने दिलेल्या वृत्तानुसार, जपान आणि फिलीपिन्स यांच्यात आगामी काळात होणाऱ्या सागरी सीमा वाटाघाटींना उत्तर म्हणून चीनने आपल्या कोस्ट गार्ड जहाजांची तैनात केली आहे. या वाटाघाटींमुळे आपल्या प्रादेशिक आणि सागरी हितसंबंधांचे उल्लंघन होत असल्याचा दावा बीजिंगने केला आहे.
चीनच्या या घोषणेला उत्तर देताना तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते श्याओ कुआंग-वेई यांनी चीनच्या भूमिकेवर टीका केली आहे. तैवानच्या पूर्वेकडील समुद्रात कायदा अंमलबजावणीचे अधिकार वापरण्यासाठी बीजिंगकडे कोणताही कायदेशीर आधार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. जपान आणि फिलीपिन्स यांच्यातील संभाव्य सागरी चर्चेचा बहाणा करून चीन या भागात आपली गस्त नियमित करण्याचा आणि आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही मोहीम प्रादेशिक स्थैर्य आणि आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित व्यवस्थेला थेट आव्हान देणारी असल्याचे श्याओ यांनी म्हटले आहे.





























































