फी थकबाकीत ५० टक्के सूट, दोन मुलांना पुन्हा शाळा प्रवेश; आईलाही मिळाली नोकरी, डोंबिवलीत शिवसेना मदतीला धावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर शाखेच्या पुढाकारातून एका गरजू कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. फी थकबाकीमुळे गणेश विद्यालयाने दोन मुलांचे निकालपत्रक दिले नव्हते. ही माहिती समजताच शिवसेना पदाधिकारी मुलांच्या मदतीला धावले. शाळा प्रशासनाशी चर्चा करून मुलांना पुन्हा शाळेत प्रवेश देण्याबरोबरच फी थकबाकीत ५० टक्के सूट मिळवून दिली. शिवाय मुलांच्या आईला शाळेत नोकरीची संधीही उपलब्ध करून दिली.

शुभांगी घोरपडे यांची मुलगी डोंबिवली पश्चिम नवापाडा येथील गणेश विद्यालयात सहावीत शिक्षण घेत असून मुलगा ज्युनिअर केजीमध्ये शिकत आहे. दोघांचीही ३० हजार रुपये फी थकित असल्याने शाळा प्रशासनाने त्यांचे निकालपत्रक रोखून ठेवले होते. परिणामी मुलांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत घोरपडे कुटुंब चिंतेत होते.

शुभांगी घोरपडे यांनी आठ दिवसांपूर्वी अक्षय म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आपली व्यथा मांडली होती. या प्रकरणाची दखल घेत सोमवारी शहरप्रमुख सुरेश परदेशी, युवासेनेचे विधानसभा अधिकारी आदित्य पाटील, विभागप्रमुख अनिल मुथा, युवासेना शाखाधिकारी यश कदम, विभाग संघटक वैभवी सालुंखे, महिला शाखा संघटक शुभांगी घोरपडे यांनी गणेश विद्यालयाचे प्राचार्य संदीप पिळणकर यांची भेट घेऊन मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विनंती केली. शिवसेना शिष्टमंडळाच्या विनंतीनुसार प्राचार्य संदीप पिळणकर यांनी थकबाकीच्या रकमेत ५० टक्के सूट दिली.

मुलांच्या चेहऱ्यावर हास्य

शहरप्रमुख सुरेश परदेशी यांनी ५ हजार रुपये तत्काळ भरले. त्यानंतर दोन्ही विद्यार्थ्यांचे निकालपत्रक त्यांच्या पालकांना देण्यात आले. तसेच मुलांना शाळेत बसण्याची परवानगीही मिळाली. शाळेत प्रवेश मिळणार असल्याचे समजताच मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

दरम्यान, घोरपडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सामाजिक बांधिलकी जपत प्राचार्य पिळणकर यांनी शुभांगी घोरपडे यांना शाळेत नोकरीही दिली. मुलांच्या फीचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल घोरपडे कुटुंबीयांनी शिवसेनेचे आणि शाळेचे आभार मानले.