तृणमूलला आणखी एक धक्का; खासदार सुष्मिता देव यांचा राजीनामा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची घेतली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून 15 वर्षे सत्तेत राहिलेल्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. तृणमूलच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार, खासदार ममता बॅनर्जी यांची साथ सोडत आहेत. विधानसभेत जवळपास 60 आमदारांनी आणि लोकसभे 20 खासदारांनी वेगळा गट बनवल्यानंतर आता राज्यसभेतील खासदारही राजीनामा देत आहेत. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील सर्वात ज्येष्ठ खासदार सुखेंदू शेखर रॉय यांच्यानंतर आता खासदार सुष्मिता देव यांनीही राजीनामा दिला आहे.

सुष्मिता देव यांनी राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. मी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असून तो कृपया त्वरित प्रभावाने स्वीकारण्यात यावा, असे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सुष्मिता देव यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतली. या भेटीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सुष्मिता देव लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

कोण आहेत सुष्मिता देव?

सुष्मिता देव या आसाम काँग्रेसचे दिग्गज नेते संतोष मोहन देव यांच्या कन्या आहेत. त्यांनी 2021 मध्ये काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्षपद भूषवले होते. तृणमूलमध्ये प्रवेश करताना त्यांनी जनसेवेच्या नव्या अध्यायाची सुरुवात करत असल्याचे म्हटले होते. यापूर्वी त्यांनी त्यांच्या वडिलांचा बालेकिल्ला असलेल्या आसाममधील सिलचर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

घराचे वासे फिरले, दीदी बदलल्या म्हणत जवळच्यांनीच ममतांना घेरले