
SIR मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या १४ शिक्षकांविरोधात सरकारी आदेशाचे उल्लंघन करून ड्युटीवर गैरहजर राहिल्याप्रकरणी तीन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. बोरिवली, दहिसर आणि मालाड परिसरातील शैक्षणिक संस्थांमधील या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
यापैकी दोन प्रकरणे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाशी संबंधित आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये एसआयआर मोहिमेत कार्यरत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या तक्रारींवरून कस्तुरबा मार्ग आणि दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात बोरिवली पूर्वेतील एका शाळेतील सहा सहाय्यक शिक्षकांची बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत सूचना देण्यात आल्यानंतरही संबंधित शिक्षक एसआयआर ड्युटीसाठी हजर झाले नाहीत. त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर १९ एप्रिल रोजी दुसरी नोटीसही देण्यात आली; मात्र त्यानंतरही त्यांनी कामावर हजेरी लावली नाही. त्यामुळे दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
दुसऱ्या प्रकरणात बोरिवली पूर्वेतील एका शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सात सहाय्यक शिक्षकांची बीएलओ म्हणून निवड करण्यात आली होती. मागाठाणे विधानसभा मतदारसंघ कार्यालयासाठी एकूण ७५ बीएलओंची आवश्यकता होती. वारंवार समन्स आणि सूचना देऊनही संबंधित सात शिक्षक ड्युटीवर उपस्थित राहिले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तिसरे प्रकरण मालाडमधील एका महानगरपालिका शाळेतील शिक्षिकेशी संबंधित आहे. त्यांचीही बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्या ड्युटीवर हजर राहिल्या नाहीत. एसआयआरच्या पर्यवेक्षण अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनुसार, संबंधित शिक्षिकेशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी फोन उचलला नाही. ६ मेपासून त्या अनुपस्थित असून कामासंबंधी कोणताही अहवालही सादर केलेला नाही. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
बीएलओची भूमिका काय?
बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) हा निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात येणारा सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी असतो. मतदान केंद्र स्तरावरील मतदार यादीची देखरेख आणि अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते. शाळांमधील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामस्तरीय कर्मचारी, महापालिका कर्मचारी, जीएसटी विभाग, म्हाडा, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आदींची बीएलओ म्हणून नियुक्ती केली जाते.
सहा टप्प्यांत होणार एसआयआर कार्यक्रम
राज्यातील विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सहा टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. यामध्ये पूर्वतयारी, मतदार नोंदणी पडताळणी, आधीच नोंद असलेले, अनुपस्थित, स्थलांतरित किंवा मृत मतदारांची (AASD) यादी तयार करणे, मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करणे, हरकती व दावे स्वीकारणे आणि अंतिम मतदार यादी प्रकाशित करणे या टप्प्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात यापूर्वी विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण मोहीम २००२ मध्ये राबविण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी ही प्रक्रिया पुन्हा हाती घेण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार स्थलांतर, मतदारांच्या नावांची पुनरावृत्ती, मृत मतदारांची नावे तसेच परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर समावेशासारख्या बाबींमुळे मतदार याद्यांमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे. त्यानुसार मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एसआयआर मोहीम राबविण्यात येत आहे.
































































