भाजपच्या उमेदवाराला 24 तासांची मुदत, मग ‘काँग्रेसच्या नारी’चा अर्ज का बाद? भाजपच्या दुटप्पीपणावर संजय राऊत कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यप्रदेशातून राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज राजकीय दबावापोटी बाद करण्यात आल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. झारखंडमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवाराला अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी 24 तासांची मुदत दिली जाते; मग केवळ एका नोटीसचे कारण पुढे करून काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा अर्ज तातडीने का बाद केला जातो? असा जळजळीत सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र शब्दांत प्रहार केला. काँग्रेसची नटराजन यांना निवडून आणण्याची पूर्ण ताकद असताना केवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली मीनाक्षी नटराजन यांच्या उमेदवारी अर्जात एक गुन्हा लपवल्याचे कारण पुढे करत हा अर्ज रद्द करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात तेलंगणामधील एका प्रकरणात त्यांना केवळ एक नोटीस आली होती, कोणताही एफआयआर दाखल नव्हता. एकीकडे संसदेत महिलांसाठी ‘नारी वंदना’ बिल आणायचे आणि दुसरीकडे विरोधी पक्षातील कर्तृत्ववान महिला नेत्यांचे खोट्या कारणांवरून अर्ज रद्द करायचे, हाच का तुमचा नारी सन्मान? असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला. झारखंडमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार परिमल नथवानी यांच्या अर्जात त्रुटी आढळल्या तेव्हा त्यांना त्या दुरुस्त करण्यासाठी 24 तासांची मुदत दिली गेली, मग एका महिलेच्या बाबतीत हा वेगळा नियम का, असा प्रश्न विचारत राऊत यांनी उपस्थित केला.

मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद; व्होट चोरीनंतर सीट चोरी… काँग्रेसचा आरोप, निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांमध्ये होणाऱ्या संभाव्य पक्षफुटीच्या आणि खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या. सध्या कोणतीही निवडणूक नसून लोकसभेच्या निवडणुकांना अजून 3 वर्षे बाकी आहेत, त्यामुळे कोणीही कुठेही जात नाहीये. ज्यांना जायचे होते ते आधीच निघून गेले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या सर्व खासदारांशी पक्षप्रमुखांचा थेट संवाद सुरू असल्याचे सांगत त्यांनी पक्षात कोणतीही धुसफूस नसल्याचे म्हटले. तृणमूल काँग्रेसमध्ये 20 ते 22 खासदार फुटले. मात्र जर खासदार फुटले असतील तर लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलेली त्यांची नावे जाहीर का केली जात नाहीत? फुटले.. फुटले… असं एक वावटळ निर्माण करायचं. अमित शहांची ही एक स्ट्रॅटरजी आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

पक्षातील फुटीरतेच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जर एखाद्याच्या मनात बेईमानीचा कीडा शिरला, तर तो कॅन्सरप्रमाणे संपूर्ण शरीर, मन आणि मेंदू पोखरून काढतो. अशा व्यक्तीने 35-40 वर्षे पक्षात सर्व पदे उपभोगलेली असली तरीही तो पक्ष सोडून जाणारच, मग तुम्ही त्यांच्यासाठी कितीही पायघड्या घातल्या तरी त्याचा उपयोग होत नाही. आज संपूर्ण देशात जे फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे, त्याला देशातील प्रमुख यंत्रणा जबाबदार आहेत. जोपर्यंत निवडणूक आयोग, केंद्रीय गृहमंत्री, ईडी, सीबीआय आणि देशामधील न्यायालये निष्पक्षपणे काम करत नाहीत, तोपर्यंत राजकीय पक्षांमधील अशा प्रकारची बेकायदेशीर तोडफोड सुरूच राहणार, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.