
भाईंदर पूर्वेला कांदळवनात मिळालेल्या एका अनोळखी आणि कुजलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात नवघर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत मृतदेहाची ओळख तर पटवलीच शिवाय एका अल्पवयीन मुलासह तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आधी दारू पाजली नंतर मित्रानेच चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून अत्यंत निघृण हत्या करण्यात आली असून जुन्या वादातून हे कृत्य करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्येनंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
भाईंदर पूर्वेच्या सचिन तेंडुलकर मैदानाच्या समोरील कांदळवनातील झाडाझुडपांत ५ जून रोजी सायंकाळी एका ३० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेह काही प्रमाणात जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. सुरुवातीला नवघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अकस्मात मृत्यूचा तपास करत असतानाच १ जून रोजी पूजानगर येथील गौरव बडसर (२५) हा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत आली होती. घटनास्थळावर मिळालेल्या वस्तू आणि बेपत्ता गौरवच्या वस्तू यांच्यात साधर्म्य आढळून आल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास चक्र फिरवली.
पोलिसी खाक्या दाखवताच कबुली
गौरव याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावरून पोलिसांचा संशय गौरवच्या मित्रांवर गेला. पोलिसांनी संशयावरून विमल आणि विशाल यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी विमल राजभर (१९), विशाल राजभर (२५) हे दोघेही रा. कविता अपार्टमेंट, गणेश गल्ली, भाईंदर पूर्व तसेच एका अल्पवयीन बालकाला अटक केली आहे.






























































