जम्मू-कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट; महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या बारामूला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये एलओसीजवळ मंगळवारी सायंकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे अचानक झालेल्या एका भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीरपुत्रांना वीरमरण आले. या स्फोटात हुतात्मा झालेल्या दोन्ही जवानांची ओळख पटली असून, यामध्ये नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी विक्रम चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शाहपूर गावचे रहिवासी अर्जुन जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

मंगळवारी संध्याकाळी उरी सेक्टरमधील कमलकोट भागात हा अचानक स्फोट झाला. या स्फोटात दोन्ही जवान गंभीररीत्या जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच लष्कराच्या अन्य सहकाऱ्यांनी तातडीने बचाव मोहीम राबवून दोन्ही जखमी जवानांना उपचारासाठी श्रीनगरच्या बदामीबाग येथील ’92 बेस हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांच्या पथकाने या दोन्ही जवानांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

अपघाताने झालेल्या ग्रेनेडच्या स्फोटात दोन जवान जखमी झाले होते. या घटनेचा तपास लष्कराकडून केला जात आहे.  आवश्यक त्या कायदेशीर आणि लष्करी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन्ही वीर जवानांचे पार्थिव पूर्ण लष्करी इतमामात त्यांच्या मूळ गावी रवाना केले जाणार आहे.