ठाण्यातून चार अल्पवयीन मुली बेपत्ता, सख्ख्या बहिणींचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घोडबंदर रोड आणि वागळे इस्टेट या भागांतून एकाच दिवशी चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वागळे इस्टेट परिसरातील १६ वर्षीय मुलगी घरातील किरकोळ वादानंतर घराबाहेर गेली. ती पुन्हा घरी परतली नाही. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने वागळे इस्टेट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

दुसऱ्या घटनेत घोडबंदर रोडवरील पातलीपाडा परिसरातून १६ आणि १४ वर्षीय दोन बहिणी बेपत्ता झाल्या. घरातून बाहेर पडलेल्या दोघींचा परिसरात शोध घेऊनही काहीच मागमूस लागला नसल्याने कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

शोधमोहीम सुरू

पातलीपाडा येथील १६ वर्षीय मुलगीही दुकानात जाऊन येते तसेच पाणी आले आहे का हे पाहण्यासाठी घराबाहेर गेली होती. मात्र ती घरी परतली नाही. परिसरात शोध घेऊनही ती न आढळल्याने नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली.

या तिन्ही घटनांमध्ये संबंधित अल्पवयीन मुलींना कोणीतरी अनोळखी व्यक्तीने फूस लावून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून वागळे इस्टेट व कासारवडवली पोलिसांनी अपहरणाचे गुन्हे दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.