
मध्य प्रदेशातून राज्यसभेची निवडणूक लढणाऱया काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज आज फेटाळण्यात आला. प्रतिज्ञापत्रात एका खटल्याची माहिती लपवल्याचे कारण त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे वातावरण तापले आहे. काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवला. भाजपने लोकशाही आणि संविधानाचा गळा घोटला आहे. व्होट चोरीपासून आता ते सीट चोरीपर्यंत आले आहेत, असा संताप मीनाक्षी नटराजन यांनी व्यक्त केला.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या दोन आणि काँग्रेसची एक जागा निवडून येऊ शकते. मात्र, पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपने तिथे तिसरा उमेदवार दिला आहे.
नेत्यांची आयोगाच्या दिल्ली कार्यालयावर धडक
अर्ज बाद झाल्याचे कळताच काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल, सचिन पायलट हे दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले. त्यांना आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे त्यांनी बाहेरच निषेध प्रदर्शन सुरू केले. नटराजन यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याचा आरोप अत्यंत बकवास आहे. काँग्रेस पक्षाकडून जागा हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न आहे,’ असा संताप वेणुगोपाल यांनी व्यक्त केला.
भाजपचे कारस्थान आधीच सुरू झाले होते
‘संख्याबळ नसतानाही भाजपने उमेदवार दिला तेव्हाच हे कटकारस्थान सुरू झाले होते. मात्र, काँग्रेसची मते फुटणार नाहीत हे लक्षात येताच कायदेशीर नोटीसच्या आडून माझ्या निवडणूक अर्जाला आव्हान दिले गेले. माझी बाजू न ऐकता निकाल दिला,’ असा आरोप नटराजन यांनी केला.
























































