चार चेंडूंत हिंदुस्थानने सामना फिरवला; हरता हरता टीम इंडिया जिंकली, अर्शद खानच्या 49 व्या षटकात तीन विकेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरता हरता सामना जिंकण्याचे कसब हिंदुस्थानी ‘अ’ संघाने दाखवून दिले. श्रीलंकेच्या ‘अ’ संघाला विजयासाठी फक्त 9 धावांची गरज होती, तर त्यांच्या तीन विकेट्स शिल्लक होत्या. त्यामुळे या सामन्यात श्रीलंकेचा संघ वरचढ होता. पण संपूर्ण सामना अर्शद खानच्या 49 व्या षटकात फिरला आणि हिंदुस्थानच्या संघाने 8 धावांनी विजय साकारला. ऋतुराज गायकवाडच्या दमदार शतकामुळे संघाला 277 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली होती.

भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली होती, पण यावेळी वैभव सूर्यवंशीच्या रूपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. वैभवला यावेळी 14 धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर प्रभसिमरन सिंगला फक्त दोन धावांवर बाद झाला आणि टीम इंडियाची 2 बाद 16 अशी अवस्था झाली होती. त्यावेळी ऋतुराज मैदानात उतरला आणि त्याने हिंदुस्थानचा डाव सावरला.

ऋतुराजने प्रियांश आर्याबरोबर खेळताना संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण प्रियांश 32 धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर ऋतुराज आणि कर्णधार तिलक वर्मा यांची चांगलीच जोडी जमली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 140 धावांची दमदार भागीदारी रचली. ऋतुराजने संघाचा डाव सावरल्यावर शतक रचले, पण त्यानंतर तो जास्त काळ खेळू शकला नाही. ऋतुराजने यावेळी 6 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 101 धावा साकारल्या. तिलकने यावेळी 2 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 60 धावा केल्या. या दोघांमुळे हिंदुस्थानचा संघ सुस्थितीत आला आणि त्यांनी 277 धावा केल्या.

हिंदुस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला 93 धावांची सलामी मिळाली. पण त्यानंतर श्रीलंकेने 16 धावांत तीन विकेट्स गमावले. यावेळी त्यांच्या मदतीला कर्णधार सहान अराचचिगे धावून आला, पण त्याला अंशुल पंबोजने 74 धावांवर बाद केले आणि श्रीलंकेची 7 बाद 262 अशी अवस्था केली. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने सात धावा जमवल्या. पण 49 व्या षटकाच्या दुसऱया चेंडूवर अर्शदने आठवी विकेट मिळवली, टीम इंडियाने त्यानंतर दोन फलंदाजांना तीन चेंडूंत बाद करत श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली.

संक्षिप्त धावफलक

भारत अ ः 50 षटकांत 6 बाद 277 (ऋतुराज गायकवाड 101, तिलक वर्मा 60; मोहम्मद सिराज 2/67) विजयी विरुद्ध श्रीलंका अ ः (सहान अराचचिगे 74; अर्शद खान 2/26).