
रत्नागिराला मंगळवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. रत्नागिरी शहरातील रस्ते जलमय झाले. शहरातील रामआळी येथील गटाराचे काम अर्धवट असल्याने भरपावसात दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. आता मुसळधार पावसात हे गटाराचे काम पूर्ण कसे होणार हा प्रश्न नागरिकांसमोर पडला आहे. आज रामआळीतील वाहतूक बंद ठेऊन गटाराचे काम भरपावसातही सुरू होते.
सोमवारी सायंकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला आहे. तसेच आज दिवसभरात ढगाळ वातावरण होते. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले. काही ठिकाणी नाले तुंबले होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात ६७.२८ मिमी पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात २६.१३ मिमी पडला. अन्य सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे.
































































