विराट कोहलीला दुखापत झाल्यामुळे तो वन डे मालिकेतमधून बाहेर पडला आणि त्याचवेळी रोहित शर्माच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे रोहित फिटनेस चाचणी देण्यासाठी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (सीओई) दाखल झाला होता. रोहित शर्माची फिटनेस चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये तो पास ठरला आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेत रोहित खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहितबरोबर हार्दिकचीही आता वन डे मालिकेत एंट्री झाली आहे.
हार्दिक पंडय़ाला पाठीच्या स्नायूंच्या दुखण्याचा त्रास होत होता, ज्यामुळे तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून काही सामने खेळू शकला नाही. त्याला फिटनेससाठी बंगळुरू येथील सीओईमध्ये पाठवण्यात आले होते. रोहित शर्मालाही आयपीएल 2026 दरम्यान स्नायूंची दुखापत झाली होती. दोघेही सीओईमध्ये उपचार घेत होते, जिथे मंगळवारी या दोघांनाही तंदुरुस्त घोषित करण्यात आले. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित आणि पंडय़ा दोघेही हिंदुस्थानी संघाचा भाग होते, परंतु त्यांचा सहभाग फिटनेस चाचणी उत्तीर्ण करण्यावर अवलंबून होता. हे दोन्ही अनुभवी खेळाडू आता अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसतील.
रोहित आपला शेवटचा वनडे सामना 18 जानेवारी 2026 या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. मार्च 2025 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यापासून हार्दिक एकही वनडे सामना खेळलेला नाही.

























































