
‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ या म्हणीचा प्रत्यय पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज आला. सत्ता जाताच अत्यंत जवळच्या आणि विश्वासू असलेल्या खासदारांनीही त्यांची साथ सोडली. इतकेच नव्हे, पक्षातील फुटीसाठी ममता बॅनर्जी यांच्यावरच ठपका ठेवला. ‘दीदी बदलल्या… त्या आधी अशा नव्हत्या. अलीकडच्या काळात त्यांना भेटणेही कठीण झाले होते,’ असे आरोप बंडखोर खासदारांनी केले.
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी घेतलेल्या एका बैठकीला आज फुटीर खासदारांनी हजेरी लावली. त्यानंतर मागच्या 17 वर्षांपासून तृणमूलच्या खासदार असलेल्या व फुटीर गटाच्या उपनेत्या शताब्दी रॉय यांनी बंडाचे कारण सांगताना ममतांवर टीका केली. ‘तृणमूल काँग्रेसमध्ये वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार सुरू होता. आम्हाला लोकांसाठी काम करायचे होते, पण आमचे म्हणणे ऐकलेही जात नव्हते. पक्षातील बदलत्या वातावरणाबद्दल कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला गप्प बसवले जात होते. सरकारमधील मंत्रीही आमचे ऐकत नव्हते. ममता बॅनर्जी यांच्याभोवती काही मोजक्या लोकांनी काsंडाळे केले होते. दीदींपर्यंत अनेकांना पोहोचू दिले जात नव्हते. दीदी निर्णय घेताना आमचा साधा सल्लाही घेत नव्हत्या. दीदींशी माझे अनेक वर्षांचे संबंध आहेत. भावनिक नाते आहे. मात्र भावनांवर कामे होत नाहीत. त्यामुळे मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे रॉय म्हणाल्या.
सीआयडीचे पथक ममतादीदींच्या घरी
तृणमूलमधील फुटीनंतर वातावरण तापलेले असतानाच सीआयडीचे पथक आज ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील घरी धडकले. तृणमूलच्या आमदारांच्या पत्रावरील बनावट सह्यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीआयडीचे अधिकारी गेल्याचे समजते.
























































