Ratnagiri News कुर्धे येथे पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे-लिंगायतवाडी व खोताचीवाडी येथील नदीवरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या छोट्या पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमाचा मृत्यू झाला आहे.पहिल्याच पावसात नदीपात्रात पाणी वाहू लागल्यामुळे पुलाजवळ अडकलेला गाळ काढताना लोखंडी खांब सटकल्याने हा स्लॅब कोसळला.

अक्षय शिवाजी काटे (वय २६, रा. क्रांतीनगर, रत्नागिरी) असे त्या मुकादमाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. तालुक्यातील कुर्धे परिसरात लिंगायतवाडी-खोताचीवाडी, फडकेवाडी आदी भागातील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी साकव योजना कार्यक्रमांतर्गत ५५ लाख रुपयांच्या निधीतून पूल उभारण्यात येत होता. या पुलावर केवळ पहिला स्लॅब टाकण्यात आला होता, तर उर्वरित काम अर्धवट होते. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला प्रचंड पाणी आले. पहिल्याच पुरात वाहून आलेला कचरा आणि गाळ पुलाच्या लोखंडी खांबांमध्ये अडकल्याने अर्धवट पुलाला धोका निर्माण झाला होता. हा गाळ काढण्यासाठी आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मुकादम अक्षय काटे यांनी दोन कामगारांसह गाळ उपसायला सुरवात केली इतक्यात लोखंडी खांब अचानक सटकले आणि पुलाच्या स्लॅब थेट अक्षय काटे यांच्या अंगावर कोसळला. शेजारी काम करणाऱ्या कामगारांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण स्लॅब अंगावर पडल्यामुळे अक्षय काटे याचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेमुळे खोताचीवाडी आणि फडकेवाडी या भागातील सुमारे १०० ते सव्वाशे लोकांचा संपर्क तुटला आहे.