Fifa World Cup मेस्सी सराव सामना खेळणार, पण… वर्ल्डकपपूर्वी प्रशिक्षकांनी घेतली सावध भूमिका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुटबॉल विश्वाचे लक्ष लागलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेपूर्वी अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी मैदानात उतरणार आहे. पण तरी त्याच्या फिटनेसबाबत कोणताही धोका पत्करला जाणार नसल्याचे अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी स्पष्ट केले आहे. आइसलँडविरुद्धच्या अखेरच्या सराव सामन्यात मेस्सी खेळणार असला तरी त्याला किती वेळ मैदानावर ठेवायचे याचा अंतिम निर्णय सामन्यापूर्वी घेतला जाईल, असे स्कालोनी यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना स्कालोनी म्हणाले, ‘मेस्सी खेळणार हे निश्चित आहे. मात्र तो किती मिनिटे खेळेल हे अद्याप ठरलेले नाही. आजच्या सरावानंतर त्याच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. कोणत्याही प्रकारचा धोका टाळणे हे आमचे प्राधान्य आहे.’ 8 जून रोजी होंडुरासविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात मेस्सी संघासोबत होता, मात्र त्याला मैदानात उतरवण्यात आले नव्हते. त्याने केवळ सामन्यापूर्वीच्या वॉर्मअपमध्ये सहभाग घेतला होता.

गतविजेता अर्जेंटिना 16 जून रोजी अल्जेरियाविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्यानंतर गट ‘जे’मध्ये ऑस्ट्रिया आणि जॉर्डनविरुद्ध त्यांचे सामने होणार आहेत. विश्वविजेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणाऱया अर्जेंटिनासाठी मेस्सीची तंदुरुस्ती हा सध्या सर्वात महत्त्वाचा विषय ठरला आहे.