
डेडलाईन संपली तरी दिवा शहरातील नालेसफाईची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. तुंबलेले नाले, भरलेली गटारे यामुळे नागरिक अक्षरशः घुसमटले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हमखास दिव्यातील गृहनिर्माण भाग पाण्याखाली जाणार आहे. या भ्रष्टाचारी कारभारातील पापिलगा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिव्यात ‘गटर पूजन’ आंदोलन केले. हे देवा यांना लवकर सुबुद्धी दे, अधिकाऱ्यांचे डोळे उघड, असे साकडे घालत शिवसैनिकांनी सत्ताधारी आणि प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.
दिवा परिसरातील अनेक नाले व गटारांची सफाई उद्यापही अर्धवट अवस्थेत असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, दिवा शहरातील नालेसफाईसाठी सुमारे 9 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात अपेक्षित कामे झालेली नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.
या भागातील प्रमुख नाल्यांमध्ये कचरा, गाळ आणि राडारोडा तसाच असल्याने ‘नालेसफाई नेमकी कुठे झाली? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पालिकेच्या नालेसफाईच्या कामाची पोलखोल करण्यासाठी कल्याण जिल्हाप्रमुख अभिजित सावंत, जिल्हा सचिव भय्यासाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे, कल्याण ग्रामीण विधानसभा, संघटक योगिता नाईक, शहरप्रमुख सचिन पाटील, उपशहरप्रमुख मारुती पटेलकर, विभागप्रमुख योगेश निकम, संजय जाधव यांच्यासह उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, संतोष कदम, उमेश भानसे, शशिकांत कुंभारगण, विलास उतेकर, तुषार सावंत, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यांच्या उपस्थितीत गटाराचे पूजन करून अनोखे आंदोलन करण्यात आले.
पावसाळ्यातील संभाव्य संकटातून दिलासा द्या
कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत व कल्याण जिल्हाप्रमुख अभिजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी गटार पूजन करून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केला. तसेच तातडीने संपूर्ण नालेसफाई करून नागरिकांना पावसाळ्यातील संभाव्य संकटातून दिलासा देण्याची मागणी केली.
पालिकेच्या घनकचरा विभागाने शहरातील नऊ प्रभाग समित्यांतर्गत येणाऱ्या ३८४.९१ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई हाती घेण्यात आली. या कामासाठी ११ कोटी ५० लाखांचा खर्च करण्यात आला.
नालेसफाई मोहिमेचा शुभारंभ १० एप्रिलपासून मुंब्यातील अमृतनगर नाल्यापासून करण्यात आला होता. ५ जूनपर्यंत सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.































































