
साईबाबांच्या शिर्डीत श्रद्धेच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी सुरू असलेला धक्कादायक प्रकार अखेर उघडकीस आला असून, अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आज मंदिर परिसरातील शेकडो प्रसाद विक्री दुकानांवर धडक छापेमारी करत पेढ्यांचे नमुने जप्त केले आहेत. बुरशी लागलेले, निकृष्ट दर्जाचे पेढे भाविकांना विकले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर ही कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.
शिर्डी हे देशातील सर्वांत मोठ्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. दररोज हजारो भाविक, तर वर्षभरात कोट्यवधी साईभक्त येथे दर्शनासाठी येतात. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसाद खरेदी करणे हा भाविकांच्या श्रद्धेचा भाग असतो. याच श्रद्धेचा फायदा घेत मंदिर परिसरातील अनेक खासगी दुकानांमधून पेढा प्रसादाची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. मात्र, या प्रसादाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. शिडींतील बुरशीयुक्त पेढ्यांबाबत भाविकांच्या तक्रारी आणि वृत्त समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले. आज सकाळपासूनच ‘एफडीए’च्या विशेष पथकाने मंदिर परिसरातील शेकडो प्रसाद विक्री दुकानांवर धाडी टाकण्यास सुरुवात केली. अनेक दुकानांमधून पेढा प्रसादाचे नमुने घेण्यात आले असून, ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. नमुन्यांमध्ये भेसळ, निकृष्ट गुणवत्ता किंवा अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
फौजदारी कारवाई होणार
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर केवळ दंडात्मक नव्हे, तर फौजदारी स्वरूपाची कारवाईदेखील करण्यात येईल. त्यामुळे शिर्डीतील प्रसाद व्यवसायाशी संबंधित अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या य धडक कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, अनेक विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धोकादायक खेळ थांबवा ! भाविकांमध्ये तीव्र संताप
निकृष्ट दर्जाचे पेढे, अपुरी माहिती असलेले पॅकेजिंग आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन यामुळे साईभक्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. श्रद्धेच्या नावाखाली भाविकांची फसवणूक आणि त्यांच्या आरोग्याशी सुरू असलेला ह धोकादायक खेळ तातडीने थांबवावा, अशी मागण आता जोर धरू लागली आहे.
दगडासारखे पेढे
धक्कादायक बाब म्हणजे, अनेक पॅकिंग केलेल्या पेढ्यांवर बुरशी आढळली आहे. काही पेढे इतके जुने आणि कठीण झाले होते की, ते अक्षरशः दगडासारखे वाटत असल्याच्या तक्रारी भाविकांनी केल्या आहेत.
शिर्डी नगरपालिका, एफडीएचे आजपर्यंत दुर्लक्ष
मंदिर परिसरातील प्रसाद विक्री व्यवसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. अनेक वर्षांपासून भेसळीचा हा प्रकार सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. प्रसादाच्या नावाखाली साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ सुरू असतानाच शिर्डी नगरपालिका, अन्न व औषध प्रशासन, तसेच इतर संबंधित विभागांनी आजपर्यंत याकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे.





























































