
अपघाताचा बनाव करून अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून हा कट रचण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणातील प्रियकरासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. न्यायालयाने दोघांनाही 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रथमेश प्रकाश थोरात (वय 25, रा. कार्वे, ता. कराड) आणि आकाश अशोक होनसुरे (वय 23, रा. कल्पतरू कॉलनी, कराड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुह्यात यापूर्वीच मृत लक्ष्मण मंडले यांची पत्नी सारिका मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान उघड झालेल्या धागेदोऱयांच्या आधारे प्रथमेश थोरात आणि आकाश होनसुरे यांना ताब्यात घेण्यात आले. हत्येसाठी वापरण्यात आलेली अल्टो कारही पोलिसांनी जप्त केली असून, लक्ष्मण मंडले यांच्या अंगावर गाडी घालण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
आकाश होनसुरे याने पैशाच्या आमिषाला बळी पडून हा प्रकार केल्याची कबुली दिली आहे. प्रथमेश थोरात याच्या सांगण्यावरून त्याने वाहन चालवत लक्ष्मण मंडले यांना लक्ष्य केले. मूळचा कर्नाटकचा असलेला आकाश हा बीसीए पदवीधर आहे.
दरम्यान, प्रथमेश थोरात याची कापड व्यवसायाच्या निमित्ताने सारिका मंडले हिच्याशी ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. गेल्या तीन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत. लक्ष्मण मंडले हे या संबंधांमध्ये अडसर ठरत असल्याने हा कट रचण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या कटामध्ये सारिका मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांनीही सक्रिय भूमिका बजावली. मात्र, हत्येसाठी आकाशला नेमकी किती रक्कम दिली, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करीत आहेत.

































































