
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ हिंदुस्थानी खलाशी असलेल्या तेलवाहू जहाजावर हल्ला केल्याची अमेरिकेने कबुली दिली आहे. या जहाजावर सर्व 24 खलाशी हिंदुस्थानी होते. त्यांना सुखरूप एअरलिफ्ट करण्यात आले. मात्र अमेरिकेने हल्ला केल्याची उघड कबुली दिल्यानंतरही मोदी सरकार गप्प बसून आहे. स्वयंघोषित विश्वगुरू यावर एवढे लाचार का, असा सवाल विरोधकांनी केला आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ ‘एमटी मॅरिव्हेक्स’ या पलाऊ ध्वज असलेल्या जहाजावर सोमवारी अमेरिकेने हल्ला केला होता. इराणने इस्रायलवर हल्ले केल्यानंतर आखातात पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे होती. त्या तणावातच या जहाजावर हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अमेरिकेने स्वतः हा हल्ला केल्याचे स्पष्ट केले. हे जहाज होर्मुझच्या जवळ अमेरिकेची नाकेबंदी टाळून निसटण्याचा प्रयत्न करत होते. जहाजाच्या चालकदलाने अमेरिकन नौदलाच्या सूचनांचे पालन केले नाही. त्यामुळे हल्ला केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. हे जहाज ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. जहाजाने चारवेळा निसटण्याचा प्रयत्न केला होता, असेही अमेरिकेने म्हटले.
एफ-18 लढाऊ विमानाद्वारे जहाजावर हल्ला
अमेरिकेच्या ‘अब्राहम लिंकन’ या विमानवाहू युद्धनौकेतील एफ-18 लढाऊ विमानाद्वारे जहाजावर हल्ला करण्यात आला. 24 खलाशांची पेटलेल्या जहाजातून थरारक सुटका करण्यात आली. मात्र अमेरिकेने हल्ल्या केल्याचे छातीठोकपणे सांगितल्यानंतरही मोदी सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बचावकार्यात मदत केल्याबद्दल ओमान सरकारचे हिंदुस्थानने आभार मानले. याव्यतिरिक्त चकार शब्दही काढलेला नाही.































































